Pune Drug Case Sarkarnama
पुणे

Pune Drug Racket : पुणे ड्रग्ज रॅकेटचे पंजाब कनेक्शन; मास्टर माइंड कुटुंबासह इंग्लंडमध्ये

आतापर्यंत पुणे पोलिसांनी 1700 किलो ड्रग्ज जप्त केले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या रॅकेटमधला मास्टर माइंड हा मूळचा पंजाबचा असून, सध्या तो कुटुंबासह इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे, अशी माहिती समोर आली आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, आता दिल्ली येथे सापडलेले 970 किलो ड्रग्ज परदेशात पाठवण्याची तयारी करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. कुरकुंभ येथील कंपनीत तीन महिन्यांत 2 हजार किलो ड्रग्जनिर्मिती करण्याचे आदेश या मास्टर माइंडने दिले होते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जनिर्मिती या कंपनीमध्ये सुरू होती. आतापर्यंत पुणे पोलिसांनी 1700 किलो ड्रग्ज जप्त केले आहे. (Pune Drug case)

पुण्याच्या मध्यवर्ती भागातून कुख्यात गुंड वैभव माने याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडे 500 ग्रॅम ड्रग्ज सापडले. चौकशीदरम्यान त्याने हैदर शेख याची माहिती दिली. त्यानंतर तपासाची चक्रे जोरदार फिरवत फोन बंद करून बसलेल्या हैदर शेख याला पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी येथून पकडले. (Punjab connection )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे दोघे सापडल्यानंतर एका गोदामात 55 किलो ड्रग्ज पकडण्यात पोलिसांना यश आले. या दोघांकडे खोलवर चौकशी केली आणि मध्यरात्री पुणे पोलिसांची पथके कुरकुंभ एमआयडीसीत पोहाेचली. येथे उत्पादन होत असलेल्या 'अर्थ फार्मा लॅब' (अर्थ केमिकल कंपनी) येथे छापे मारले. तेथून तब्बल ५५० किलो एमडी जप्त केले. कंपनी मालक भीमाजी ऊर्फ अनिल साबळे (वय ४५) व केमिकल इंजिनिअर युवराज भुजबळ (वय ४०) यांना ताब्यात घेतले आहे. (Marathi News)

कुरकुंभ एमआयडीसीमध्ये कारवाई केल्यानंतर पोलिसांनी 18 पथके तयार केली. या पथकांनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये छापे टाकले. आतापर्यंतच्या तपासात हे मोठे इंटरनॅशनल रॅकेट असून, याचा मास्टर माइंड पंजाब येथील असल्याचे समोर आले आहे.

दिल्लीतून परदेशात पाठविण्याचा होता प्लॅन

पुण्यातील या ड्रग्ज रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचे वास्तव समोर आला आहे. पुण्यातून ड्रग्ज दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, मीरा भाईंदर अशा शहरांमध्ये विकण्यासाठी पाठवलं जात होतं. दिल्लीत साडेनऊशे किलो ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. दिल्लीत करण्यात आलेला ड्रग्जचा साठा परदेशात पाठवला जाणार होता, अशी सूत्रांची माहिती आहे.

2015 मध्येही छापेमारी

पोलिसांनी 2015 मध्ये कुरकुंभ येथील कंपनीवर ड्रग्जनिर्मिती होत असल्याने छापा टाकला होता. या वेळी त्या ठिकाणाहून साडेतीनशे किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आलेला मूळचा पंजाबचा असलेला आरोपी हाच या ड्रग्ज रॅकेटचा मास्टर माइंड असल्याचं समोर आलं आहे.

‘फॉर्म्युल्याप्रमाणे उत्पादन तयार करा’

भीमाजी साबळे याच्या कुरकुंभमधील एका कारखान्यावर एमडी ड्रग्ज बनवले जात होते. युवराज भुजबळ हा केमिस्ट्री विषयातील पीएच. डी. असल्यामुळे त्याने साबळे याच्यावर ड्रग्जनिर्मितीची जबाबदारी दिली होती. भुजबळला एक उत्पादन बनवून द्यायचे आहे, त्यासाठी भुजबळ कच्चा माल पुरवणार असून, फॉर्म्युल्याप्रमाणे उत्पादन तयार करायचे, अशा सूचना साबळे याने कारखान्यातील कामगारांना दिल्या होत्या.

"रेडी टू ईट" फूड पाकिटांच्या माध्यमातून थेट लंडनमध्ये

एम डी ड्रग्स ची कुरकुंभ मध्ये निर्मिती होत तर त्याचे सेवन लंडन मध्ये होत आल्याचे उघड झाले आहे. "रेडी टू ईट" फूड पाकिटांच्या माध्यमातून एम डी ड्रग्स पोहचले थेट लंडन मध्ये पोचवण्यात येत होते. त्यासाठी कुरकुंभ एम आय डी सी मधील कारखान्यातील मुद्देमाल दिल्लीत आणि तिथून लंडनला कुरिअर करण्यात आला होता.

दिवेश भुटीया, संदीप कुमार, संदीप यादव या तीन जणांवर होती ड्रग्स लंडनला पाठवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. भुटीया आणि कुमार हे दोघे ही फूड कुरिअरचा व्यवसाय करीत होते. आत्तापर्यंत दिल्लीतून लंडनमध्ये चार पार्सल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे ड्रग्स प्रकरणाचे थेट लंडन कनेक्शन समोर आले आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT