Baramati News : आगामी लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाला एक जागा सोडण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे, असे सांगून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढ्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. आता जानकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
बारामतीत आज (ता. 3 मार्च) शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांची उमेदवारी, तसेच वंचित बहुजन आघाडीसोबत सुरू असलेल्या चर्चेसंदर्भात तसेच विविध विषयांवर अर्धा तास भाष्य केले. पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची उद्या (ता. 4 मार्च) होणार असून त्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारामतीत शनिवारी नमो महारोजगार मेळावा झाला. त्या मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये आपलं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आले, अशी खंतही शरद पवार यांनी व्यक्त केली. दरम्यान, याच मेळाव्यात युवकांची फसवणूक करण्यात आलेली आहे. कारण, त्यांना हाउसकीपिंग यांसारख्या काही नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, असेही शरद पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.
नमो महारोजगार मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास
इयत्ता दहावीची परीक्षा सुरू असताना बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये नमो महारोजगार मेळावा घेणे चुकीचे होते. दहावीच्या परीक्षेचे केंद्र बदलण्यात येणार आहे, असे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र, ते बदलण्यात आले नाही, त्यामुळे दहावीच्या परिक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागला, असेही पवारांनी नमूद केले.
ती निव्वळ अफवा
शरद पवार म्हणाले, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने केवळ सहा जागांची मागणी महाविकास आघाडीसोबतच्या चर्चेत केली आहे. त्यांनी 27 जागा मागितल्या आहेत, ही केवळ अफवा आहे. वंचितने एवढ्या जागा मागितलेल्या नाहीत.
वंचितशी आघाडीबाबत आग्रही
‘वंचित’ने जास्त जागा मागितल्या आहेत, याबाबत कार्यकर्ते आणि माध्यमांचाही काहीही गैरसमज झालेला आहे. त्यांनी निव्वळ सहा जागांची मागणी केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीची स्वतःची व्होट बँक आहे. ती महत्त्वाची असून आंबेडकर यांच्यासोबत आघाडी व्हावी, यासाठी मी स्वतः आग्रही आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.