Sharad Pawar-Dada Jadhavrao-Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Dada Jadhavrao News : माजी मंत्री दादा जाधवरावांनी अजितदादांकडे पवारांबाबतची कोणती खंत बोलून दाखवली?

Vijaykumar Dudhale

Pune, 09 April : पुरंदर विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाच वेळा निवडून आलेले माजी राज्यमंत्री दादा जाधवराव यांनी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आपल्या मनातील खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलून दाखवली आहे. ती खंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत असून येत्या निवडणुकीत त्याची परतफेड करण्याचा इरादाही दादा जाधवरावांनी अजित पवारांपुढे व्यक्त केला.

बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (ता. 09 एप्रिल) आपल्या मनातील सर्व गोष्टी बोलून दाखवल्या. त्यात पुरंदरचे माजी मंत्री दादा जाधवराव (Dada Jadhavrao) यांच्याशी संबंधित गोष्टीचाही उलगडा केला. अजित पवार म्हणाले, माजी राज्यमंत्री दादा जाधवराव यांना भेटायला मी गेलो होतो. मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. कारण मी त्यांच्याबरोबर पाच टर्म आमदार म्हणून काम केले आहे. मी बसून आहे, माझं व्यवस्थित चाललं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी पुरंदमध्ये (Purandar) 25 वर्षे आमदार होतो. त्यामुळे माझ्या गाडीत बसून माझ्या काही लोकांना भेटणार आहे. त्यांना सुनेत्रा पवार यांना मतदान करायला सांगणार आहे. त्यावर मी म्हटलं कशाला फिरता? त्यावर ते म्हणाले, सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार आहेत, म्हणून तर मतदान करायचंच. पण, त्यांनी मला एक आठवण सांगितली, असेही अजितदादांनी नमूद केले.

अजित, मी 69 वर्षांचा होतो. मी 69 वर्षांचा असताना तुझ्या काकांनी म्हणजे पवारसाहेबांनी दोन सभेत ‘हा गडी म्हातारा झाला आहे, या गड्याला बाजार दाखवा. आपल्याकडील बैल म्हातारा झाल्यावर त्याला आपण बाजार दाखवतो’ अशी भाषा माझ्याबाबत वापरली होती. मी त्यांना दैवत मानायचो. पण त्यांनी मला बैलाची उपमा दिली. मी 69 वर्षांचा असतानाही मला म्हाताऱ्याची उपमा दिली. त्या निवडणुकीत मी पराभूत झालो. मला काय रे वाटले असेल. बैल, बाजार दाखवा असे शब्द माझ्याबाबत वापरले, अशी खंत दादा जाधवराव यांनी अजित पवार यांच्याकडे बोलून दाखवली.

अजित पवार म्हणाले, त्या निवडणुकीत अशोक टेकवडे आमदार झाले. अर्थात त्यावेळी अशोक काळभोर यांनी हवेलीतील मते घेतली होती, त्यामुळे मतांची विभागणी होऊन दादा जाधवराव यांचा पराभव झाला. पण, प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. मीही आता तोलून मापून बोलतो. कारण पुढील काही वर्षांनी ते बोलणं माझ्याही अंगलट यायला नको. दादा जाधवराव यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. हे काही बरोबर नाही. अशा पद्धतीचं राजकारण आहे, सांगायचं म्हटलं तरी दिवस पुरणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT