Mahavikas Aghadi Vs Mahayuti  Sarkarnama
विशेष

Maharashtra Assembly Election : 158 मतदारसंघांचा कौल ठरवणार, सत्तेचं सिंहासन कुणाचं? विदर्भात टशन

Political News : राज्यातील सत्तेची समीकरणे जुळवताना महायुती आणि महाविकास आघाडीला तारेवरची कसरत करावी लागत असतानाच राज्यातील सत्तेची दारे ही 158 मतदारसंघ उघडणार आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदानाला दहा दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळेच निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने जोर लावला आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीचे नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे राज्यातील सत्तेची समीकरणे जुळवताना महायुती आणि महाविकास आघाडीला तारेवरची कसरत करावी लागत असतानाच राज्यातील सत्तेची दारे ही 158 मतदारसंघ उघडणार आहेत. ( Assembly Election)

राज्यातील 288 पैकी बहुमताचा 145 हा आकडा गाठण्यासाठी या 158 मतदारसंघात होत असलेल्या थेट लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या 158 मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदे यांची शिवसेना (Shivsena) विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. त्यामुळे या 158 मतदारसंघातील थेट लढतीत कोण बाजी मारणार त्याची सत्ता राज्यात येणार आहे. त्यातच आता भाजप की काँग्रेसमध्ये कोण सरस, शिवसेनेवर वर्चस्व कोणाचे एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंचे, राष्ट्रवादी काँग्रेस दादांची की साहेबांची? हे बघणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील तब्बल 75 मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. त्यातही विदर्भात सर्वाधिक 35 भाजप विरुद्ध काँग्रेस (Congress)अशी थेट लढत होणार आहे. त्यानंतर दुसरी थेट लढत दोन्ही शिवसेनामध्ये होत आहे. शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंच्या सेनेमध्ये तब्बल 46 मतदारसंघात एकमेकाच्या विरोधात लढती होत आहेत. तर राज्यातील 37 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अशी एकूण राज्यातील 158 मतदारसंघात आपापसात संघर्ष होत आहे.

विदर्भात जवळपास 66 जागा आहेत. या ठिकाणचा मतदारराजा खऱ्या अर्थाने किंग ठरतो हे आजपर्यंतचे चित्र आहे. विदर्भात जो पक्ष मोठा ठरतो तोच सत्तेच्या जवळ जातो असे चित्र आहे. त्यामुळेच विदर्भात कोण मोठं पक्ष ठरणार यावर पुढील राजकीय गणिते अवलंबुन असणार आहेत. गेल्या लोकसभेच्या 10 आणि विधानसभेच्या 66 सर्वाधिक जागांच्या या प्रदेशात काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमधील मुख्य लढती एकट्या विदर्भात आहेत.

त्यामुळेच महायुती आणि मविआमध्ये विदर्भाच्या जागेवरून घमासान झाल्याचे बघायला मिळाले होते. विदर्भ हा राज्याच्या राजकीय पटलावर महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने दिसून आहे. त्यामुळे राज्यात सत्तेची किल्ली महायुतीकडे जाईल, की महाविकास आघाडीकडे, याचा निर्णय विदर्भ ठरवणार आहे. विदर्भाचे राजकीय गणित बघता यंदा विदर्भात सर्वाधिक 35 जागेवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. या थेट लढतीमुळे फक्त राज्यातील सत्तेत कोण बसेल ? याचा निर्णयच होणार नाही, तर सत्तेमध्ये काळ येणार हे ठरणार आहे.

राज्यातील तब्बल 46 मतदार संघात दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. त्यामध्ये विदर्भात 5 मतदारसंघात दोन्ही शिवसेना समोरासमोर आहेत. तर मराठवाड्यात 10, पश्चिम महाराष्ट्रात 8, मुंबईत 10, उत्तर महाराष्ट्रात 4 आणि कोकणात 9 मतदारसंघात दोन्ही शिवसेना समोरासमोर आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील 37 मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही राष्ट्रवादी विदर्भात 3 मतदारसंघात, मराठवाड्यात 6 ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 21 ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचे संघर्ष होणार आहे. मुंबईत 1, उत्तर महाराष्ट्रात 3 आणि कोकणात ही 3 ठिकाणी काका पुतण्यांचे पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहे.

'या' मतदारसंघाकडे असणार लक्ष

या शिवाय राज्यातील 38 मतदारसंघ असे आहेत, जिथे भाजप उमेदवारांसमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांचा कौल ही मत्त्वाचा ठरेल. शिवाय 34 मतदारसंघात भाजपचे उमेदवार कधीकाळी मित्र पक्ष राहिलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांसमोर उभे टाकले आहेत. त्याशिवाय 19 मतदारसंघात शिंदेंच्या शिवसैनिक काँग्रेस समोर उभे आहेत. त्यामुळे हे मतदारसंघ ही राज्याच्या सत्तेचा निकाल निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT