Eknath Shinde  Sarkarnama
विशेष

CM Eknath Shinde Birthday : ..अरे, प्रभाकर कुठे आहेस? सचिन जोशी बघ काय करतोय?

Happy Birthday CM Eknath Shinde : सत्ता राहील न राहील…पण एक शाश्वत असेल ते त्यांचं माणूसपण.

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

“अरे, प्रभाकर कुठे आहेस? दाढीवरून हात फिरवत एकनाथ संभाजी शिंदे बोलत असतात. सचिन जोशी बघ काय करतोय? बोलव त्याला. सचिन धावत धावत येतो. अरे, आपल्या धुळ्याचे आमदार शरद पाटीलचे काय काम आहे बघ. आधी बोल त्यांच्याशी. काय म्हणतात ते नीट ऐक आणि पाठव माझ्याकडे. प्रभाकर असो, की सचिन ही दोन माणसं कालसुद्धा म्हणजे त्यांचे साहेब आमदार असतानासुद्धा शिंदे यांच्याबरोबर होती आणि आजसुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर सावलीसारखी आहेत.

हे सांगण्याचे कारण म्हणजे एकदा का कोणाला शिंदे यांनी आपला माणूस मानला, की तो शेवटपर्यंत त्यांचा होतो. काही माहीत नाही; पण या माणसाकडे माणसं जोडण्याची, राखण्याची कला आहे. मग तो साधा कार्यकर्ता असो की आमदार, खासदार! राजकारणात एकदा माणूस उपयोगाचा झाला नाही की त्याला दूर करायचं, हा शिरस्ता त्यांना मंजूर नाही, हे मी स्वतः जवळून अनुभवलंय. राजकीय पत्रकार असल्यापासून मी त्यांना दोन एक दशकं बघतोय… (CM Eknath Shinde Birthday)

छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांनी मातोश्रीशी फारकत घेत वेगळी चूल मांडली तरी शिंदे यांनी केलेले बंड हे उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागणारं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना बाकीची बंड झाली होती, पण आता कुठे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्थिरस्थावर होतेय, असं वाटत असताना शिंदेंच्या बंडाने शिवसेनेचे दोन तुकडे केले. मुख्य म्हणजे एका शिवसेनेची दोन शिवसेना झाली आणि पक्ष, चिन्ह शिंदे यांच्याकडे गेल्याने मातोश्रीची पायाखालची वाळू सरकली आणि आज शिंदे यांचे मिंधे झाले… पन्नास खोके ओके झाले! पण, हे का झाले? कोणाही निष्ठावंत शिवसैनिकाला हे बंड पटणार नसलं तरी हे काही एका रात्रीत झालेले नाही. विधिमंडळ अधिवेशन असो की निवडणुका, लग्न असो की आजार, मृत्यू असो की जन्म या जन्माला आल्यापासून ते मरणापर्यंतच्या वाटेवरचा जिवाभावाचा आधारवड शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींसाठी शिंदे ठरलेत. (Eknath Shinde)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लगबग सुरू झालेली असायची. माझ्याकडे शिवसेना पक्ष असल्याने मी रोज शिवसेना कार्यालयात जात असे. शिंदे आले की त्यांच्यासोबत फक्त मुंबई, ठाणेच नव्हे तर चांदा ते बांद्यापर्यंतचे आमदार मागे असत…जणू राजा पुढे, सैनिक मागे! असे हे चित्र असे. खरंतर त्यावेळी सुभाष देसाई, रामदास कदम, दिवाकर रावते असे ज्येष्ठ नेते आणि मंत्री असतानासुद्धा शिंदे यांच्या मागे इतके आमदार का असतात? या प्रश्नावर आता कोणी “पन्नास खोके, एकदम ओके”, या उत्तरात देत असतील तर ते अर्धसत्य आहे. कोणी फक्त तात्कालिक फायद्यासाठी आणि पैशासाठी कोणामागे जात नसतो. तो काही वर्षांची एखाद्या माणसाविषयी निर्माण झालेला जिव्हाळा असतो…या आमदारांच्या सुखदुःखात शिंदे उभे राहिलेत. (Maharashtra CM Eknath Shinde Birthday )

मातोश्री तिकीट वाटप करत असेल, पण तिकिटं दिलेल्या आपल्या माणसांना निवडून आणण्याची सर्व जबाबदारी, मग ती आर्थिक असो की मनुष्यबळाची ती कायम शिंदे उचलत आले आहेत. आणि हे करताना कुठे हाक नाही की बोंब नाही. सर्व शांततेत! काही दिलं तर या हाताचं त्या हाताला माहीत नाही. आणि आपण कोणासाठी काही करतोय, याचा कुठलाच गर्व नाही…पुन्हा एकदा दाढीवरून हात फिरवत, हलकेसे स्मित करत, समोरच्या माणसाच्या पाठीवर हात ठेवत दिला जातो तो फक्त आत्मविश्वास! मला वाटतं त्यांच्या मागे आनंद दिघे उभे असावेत.

बाळासाहेब ठाकरे समोर उभे राहून आपला हा एकनाथ कसा लोकांना सामोरे जातोय, हे पाहत असावेत… शिवसैनिकांसाठी ही दोन देव माणसं शिंदे यांच्या रूपात एक माणूस घडवत असावीत! ही काही मी एकनाथ शिंदे यांची आरती ओवाळत नाही. मला जसे ते दिसले ते मी सांगतोय. कदाचित ठाण्याच्या दिघेंच्या मठात गुरूकडून शिष्याला मिळालेली ही गुरुदक्षिणा असेल. मी ठाण्याच्या मठातसुद्धा दिघे यांच्या पश्चात शिंदे यांनी घेतलेला जनतेचा दरबार बघितलाय… तीच गर्दी, त्याच जगण्या मरण्याच्या असंख्य आशा घेऊन आलेली साधी माणसं! त्यांना मिळणारा झटपट न्याय आणि बरंच काही…

पत्रकाराने कायम सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोललं पाहिजे. सत्तेवर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा कायम अंकुश असावा, हे मानणारा मी राहिलोय; पण आपण जो आरसा समाजाला दाखवत असतो तो आरसा धूसर असता कामा नये, चित्रं स्वच्छ व स्पष्ट दिसायला हवं. तोच हा छोटा प्रयत्न आहे.

कोरोना कालखंडात, संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना दुसरीकडे वर्षा बंगल्याचे दरवाजे स्वपक्षीय आमदारांसाठीही बंद झाले होते. त्यांची गाऱ्हाणी अडचणी ऐकून घेणे तर दूरच, पण त्यांचे साधे साधे प्रश्न सोडवायला देखील कुणीही उपलब्ध नव्हते. अशावेळी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे या आमदारांच्या मदतीसाठी ठाम उभे राहिले. अनेकांना मदत केली, गरजूंना रेशन तर उपचार घेणाऱ्यांना रेमडेसिवीर पोहोचवली व शक्य तेवढे जीव वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. कोरोना ओसरला तरीही वर्षाचे दरवाजे काही उघडायचे नाव घेई ना...कधी साहेब बिझी आहेत, कधी ते फिजिओथेरपी घेताहेत, कधी ते मीटिंगमध्ये आहेत…अशी नवनवीन कारणे ऐकून कंटाळलेले आमदार, खासदार, पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या बंगल्यावर जमायचे, तिथे शिंदे हे त्यांच्यावर महाविकास आघाडीतील इतर पक्षाच्या नेत्यांकडून होणारा अन्याय ऐकून घ्यायचे त्यांचं म्हणणं समजून घ्यायचे. मात्र, वरती साहेबांशी एकदा बोलतो या पलीकडे त्यांच्याकडेही देण्यासारखे दुसरे उत्तर नव्हते.

तिथे वर्षा बंगल्यावर कायम असलेली नो एन्ट्री आणि इथे नंदनवनवर कधीही आलो तरी निदान मिळणारे दोन घास, चहा, नाष्टा यामुळे एकीकडे आपल्याला खिजगणतीत न धरणारे नेतृत्व आणि दुसरीकडे आपल्या अडीअडचणीला धावणारा नेता यात बहुतांश आमदारांनी एकनाथ शिंदे यांना आपला नेता मानून पुढे जाण्याचा निर्णय घेतला…

उद्या एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता राहील न राहील…भाजप आज त्यांना आपला माणूस सांगत आहे, उद्या कदाचित सांगणारसुद्धा नाही…पण एक शाश्वत असेल ते त्यांचं माणूसपण. ते कोणीही हिरावून घेणार नाही!

SCROLL FOR NEXT