Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. 48 पैकी 31 खासदार निवडून आल्याने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या लाटेवर स्वार होऊन विजयश्री खेचून आणण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यातील अनेक नेतेमंडळीने महायुतीला वाऱ्यावर सोडून देत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीतील संधी मिळेल त्या पक्षात प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीला मोठे यश मिळाले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर इकडून तिकडे गेलेल्यांची चांगलीच पंचाईत झाली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीत तिकीट मिळाले नाही म्हणून औपचारिक पक्ष बदलणारे पण पराभूत झालेले आता पुन्हा घरवापसी करत आहेत. सर्व पक्षही आता 'सुबह का भूला रात को घर लौटे तो उसे भूला नहीं कहते' म्हणत त्यांचे सानंद स्वागत करत आहेत. सध्या राजकारणात सत्तेविना मला करमेना ! या नाटकाचा दुसरा अंक सुरु झाल्याचे दिसत आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन, जालना जिल्ह्यातील दोन तर नांदेड जिल्ह्यातील सहा नेत्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला सोडून महायुतीमधील पूर्वीच्या पक्षाला जवळ केले आहे. त्यामुळे सध्या मराठवाड्यतील वातावरण सध्या तरी महायुतीमय झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये शिंदे सेनेच्या (Shivsena) अब्दुल सत्तारांविरोधात उबाठाकडून निवडणूक लढलेले सुरेश बनकर तीनच महिन्यात पुन्हा भाजपमध्ये परतले आहेत. तर वैजापूरमध्ये शिंदे सेनेच्या रमेश बोरनारे यांच्याविरोधात लढलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधवही पुन्हा परतले आहेत. गंगापूरमध्ये भाजपच्या प्रशांत बंब यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून लढलेले विद्यमान विधान परिषद सदस्य व शिक्षणसम्राट सतीश चव्हाण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात परतले आहेत.
जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये घरवापसी नाही तर सत्ताधारी पक्षांत प्रवेश केला आहे. भाजपच्या (BJP) बबनराव लोणीकर यांच्याविरोधात उबाठाकडून लढलेले आसाराम बोराडे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे तर मूळ काँग्रेसचे पण अपक्ष म्हणून लढलेले सुरेश जेथलिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे घनसावंगीत शिंदे सेनेच्या हिकमत उढाण यांच्याविरोधात अपक्ष लढलेले सतीश घाटगे भाजपमध्ये परतले आहेत.
नांदेड जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर कुटुंब अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उंबरठ्यावर आहेत. तर दुसरीकडे लोहा कंधारमधून प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले एकनाथ पवार यांनी उबाठा पक्षाला सोडचिठी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नांदेड दक्षिणमधून दिलीप कंदकुर्ते, संजय घोगरे, लोहा मतदारसंघातून एकनाथ पवार, नांदेड उत्तरमधून मिलिंद देशमुख यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात लवकरच प्रवेश करणार आहेत. त्यामुळे इतर पक्षातून महायुतीमध्ये येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या सर्व पक्षतारांमुळे गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील इनकमिंग चांगलेच वाढले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.