Sharad Pawar-Supriya Sule
Sharad Pawar-Supriya Sule Sarkarnama
विशेष

Split in NCP : ऐंशी वर्षांच्या वडिलांना कोर्टात एकटं कसं जाऊ देईन?; न्यायालयीन लढाईवर बोलताना सुप्रिया सुळे भावूक

मंगेश कचरे

Indapur News : माझा अर्धा वेळ हा केसेस लढण्यातच जात आहे. नवऱ्याला आणि मुला-बाळांना सांगून ठेवलं आहे की, आता ११ महिने टाटा-बाय, मला फक्त टीव्हीवरच बघायचं. सगळ्या जबाबदाऱ्या असतात, एकटा माणूस सगळं करू शकत नाही. ऑक्टोबरपर्यंत वेळच नाही. मतदारसंघ बघायचा, पक्षाची कामं बघायची, की कोर्टाच्या केसेस बघायच्या. पवारसाहेब स्वतः जातात. जनाची नाही मनाची तरी आहे ना आणि ८० वर्षांच्या वडिलांना कोर्टात मी एकटं जाऊ देईल का, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व आघाड्यांवर सध्या सुरू असलेल्या लढाईबाबत भाष्य केले. (Supriya Sule's Comment Court Battle between Sharad Pawar and Ajit Pawar)

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. दोन्ही गटांकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात आहे. त्यात शरद पवार गटाकडून लढणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी न्यायालयीन लढाई, मतदारसंघ, पक्षाचे काम आणि कुटुंब यावरून होणारी ओढाताण याबाबत इंदापूर तालुक्यातील बोरी येथे बोलताना भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुरुवातीला एक-दोन वेळा सुप्रीम कोर्टात गेल्यावर थोडं दडपण आलं होतं. पण, आता न्यायालयीन लढा लढताना मजा यायला लागली आहे. हरेंगे या जितेंगे, ये बाद मे देखेंगे. मगर लढेंगे जरूर!, असे आव्हानही त्यांनी अजित पवार गटाला दिले. आता कोर्टाची पायरी चढलोय, आता उतरायचे नाही. जे होईल ते बघू कोर्टामध्ये. जेव्हा आपण खरे असतो, तेव्हा लढायची, निकालाची भीती वाटत नाही. कारण आपण खऱ्याच्या वाटेने चाललो आहोत, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक आयोग कधी निकाल देतो, हे माहिती नाही. ते प्रकरण किती दिवस चालेल, याचाही पत्ता नाही. वकिलांबरोबर राहायची आता सवय झालीय. बरेच दिवस वकील भेटले नाही तर कसं तरी वाटतं. दोन्ही बाजूचे वकील माझे दोस्त आहेत. त्यामुळे मी चहा एका बरोबर घेते, दुसऱ्याबरोबर लढते आणि जेवण एका बरोबर करते, त्यामुळे लोक म्हणत असतील की हे काय चाललंय. पण मी त्यांना प्रेमाने म्हणते आपली दोस्ती एक तरफ और आपली लढाई एक तरफ. काही वकील हे शरद पवार यांना भेटल्यानंतर स्वारी म्हणतात, पण ते त्यांच्या क्लाइंटच्याच बाजूने बोलणार ना.

दिल्लीतील एक वकील हे सदानंद सुळेंचे वर्गमित्र आहेत. तेदेखील मला येऊन भेटतात आणि पण कोर्टात माझ्याच विरोधात बोलतात. त्यामुळे मतदारांनो, मला समजून घ्या, तुमचा खासदार मतदारसंघातून गायब झाला नाही, तर तो रोज सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशनकडे हेलपाटे मारत आहे, अशी मिश्किल टिप्पणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी या वेळी केली.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी

दिवाळीच्या सणानिमित्त पवार कुटुंबीय हे बारामतीत असते. इंदापूर तालुक्यातील बोरी गावाला भेट देत खासदार सुप्रिया सुळे यांनी गावकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सद्यःस्थिती अत्यंत भयानक असून, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना जीवन जगणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT