Nitesh Rane-Eknath Khadse  Sarkarnama
विशेष

Maharashtra Politics : राणेंनी झळकावलेल्या फोटोला महाविकास आघाडीचे विधान परिषदेतून उत्तर...

दाऊदच्या नातेवाइकांच्या लग्नाला मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीचा फोटो एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत झळकावला

Vijaykumar Dudhale

Nagpur News : आमदार नितेश राणे यांनी शनिवारी (16 डिसेंबर) विधानसभेत ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबत पार्टी करतानाचा फोटो झळकावला होता. त्यानंतर राज्यात बराच गदरोळ उडाला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. त्याला महाविकास आघाडीकडून आज विधान परिषदेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो झळकावून उत्तर देण्यात आले. (Mahavikas Aghadi's reply from Legislative Council to photo shown by Rane in the Assembly)

मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टर माइंड दाऊद इब्राहिम याच्या कथित नातेवाइकाच्या लग्नातील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा एक फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज (18 डिसेंबर) विधान परिषदेत झळकावला. नाशिकमध्ये 2017 मध्ये झालेल्या दाऊदच्या नातेवाइकांच्या लग्नात महाजन यांनी हजेरी लावली होती. तसेच, एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदारांनीही त्या लग्नाला हजेरी लावली हेाती, असा आरोप केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गिरीश महाजन हे त्यावेळी नाशिकचे पालकमंत्री होते. महाजन यांच्यावर गंभीर आरोप होत असल्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही खडसे यांनी केली. तसेच, सुधाकर बडगुजर यांचे नाव तुम्हाला घेता आलं आणि गिरीश महाजन यांचं नाव घेतल्यावर तुम्हाला मिरच्या लागल्या, असा सवालही केला.

दाऊदच्या नातेवाइकाच्या लग्नाला महाजन यांनी लावलेल्या हजेरीची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच, सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाचीही चौकशी लावावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित मंत्री महाजन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. त्यामुळे भाजपने शिवसेनेच्या नेत्यावर केलेल्या आरोपाला महाविकास आघाडीने विधान परिषदेतून उत्तर दिल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, या वेळी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी खडसेंना सूचना करताना तुम्ही मंत्र्यांचे नाव न घेता फोटो दाखवा, अशी सूचना केली. तसेच 289 मध्ये कुठल्याही मंत्र्यांचे नाव नव्हते, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत शनिवारी मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी सलिम कुत्ता हा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करत होता, असा आरोप करत त्याबाबतचा फोटो आमदार नितेश राणे यांनी झकळवला होता. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही उबाठा गटावर हल्लाबोल करत या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्टी प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT