PM Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

PM Narendra Modi Parliament Speech: काँग्रेसचा हिशेब,लोकसभेची रणनीती अन् मोदींची गॅरंटी...

Sachin Deshpande

Loksabha Election 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडताना सोमवारी (ता.6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर थेट प्रहार केला. त्यांनी काँग्रेसच्या कॅन्सल कल्चरवर प्रहार करत काँग्रेसच्या घराणेशाहीची व्याख्याच सांगितली. विद्यमान काँग्रेसला पंडीत नेहरू ते इंदिरा गांधी यांच्या पराभूत मानसिकेतेची लागण झाल्याचा आरोप केला. देशातील ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेस करते.

पण, बिहारचे जननायक भारतरत्न कर्पूरी ठाकूर या ओबीसी नेत्याला दिलेल्या त्रासाची आठवण मोदींनी काँग्रेसला करुन दिली. इतक्यावर मोदी थांबले नाही तर त्यांनी स्वतः ओबीसी असल्याचे सांगत त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. मोदींनी आज पुन्हा एकदा ओबीसी हे कार्ड समोर करत भाजपाची लोकसभा निवडणूकीची रणनीती स्पष्टपणे अधोरेखित केली. काँग्रेसवर टीका आणि ओबीसींची सहानुभूती हे राजकीय व सामाजिक धोरण त्यांनी मांडले.

भाजपाच्या दहा वर्षाच्या शासन काळात झालेले मोठे आर्थिक बदल आणि काँग्रेस कार्यकाळातील स्लो विकासावर मोदींनी प्रहार केला. देशाला तिसरी आर्थिक महाशक्तीची गॅरंटी मोदींनी आज पुन्हा दिली. काँग्रेस नेते ‘नामदार आहेत आम्ही कामदार आहो’ असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. नारीशक्ती, युवा कल्याणावर मोदींनी प्रभावी भाषण केले. लोकसभेत भाजपाचे फ्लोअर मॅनेजमेंट आज जबरदस्त होते. सर्व मंत्री पंतप्रधानाच्या भाषणाला उपस्थित होते. विरोधातील काहीच काँग्रेस नेते सभागृहात दिसले.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु आणि इंदिरा गांधी यांचे विविध दाखले देत मोदींनी सोमवारी काँग्रेसच्या कॅन्सल कल्चरची लोकसभेत चिरफाड केली. नेहरुंनी केलेल्या पहिल्या भाषणात देशातील नागरिकांना आळशी आणि बिनडोकं म्हटले, तर इंदिरा गांधींनी पराभूत मानसिकता काँग्रेसला लागली असल्याचा दावा मोदींनी केला. ‘इंडिया’ आघाडी ही भानुमतीचा कुणबा असल्याचा आरोप केला.

मोदींनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोटर मॅकेनिक होत इंडिया आघाडीच्या अलायन्स चे अलाॅयमेंट बिघडविल्याचा आरोप केला. मोदींनी भाषणात तीनदा नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या वाक्यांचा संदर्भ देत काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस येते आणि महागाई आणते असे सांगत नेहरु व गांधी यांनी महागाई आणल्याचा दावा मोदींनी केला. नेहरुंच्या सत्तेला बारा वर्षे झाल्यानंतर देखील महागाई कायम होती असे नेहरुंचे वाक्यच आज मोदींनी लोकसभेत वाचले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजीव गांधी यांचे नाव न घेता त्यांच्या एक रुपयातील 15 पैसे गरिबांपर्यंत पोहचत असल्याचे उदाहरण मोदींनी दिले. मोदी सरकारच्या काळात डायरेक्ट बिनिफिट मुळे 30 लाख कोटी लोकांपर्यंत पोहचले. काँग्रेस च्या काळात या पैकी किती रक्कम लाभार्थ्यांना भेटली असती. अशी विचारणा त्यांनी केली. देशातील सरकारी योजनेतील काँग्रेस शासन काळातील 10 कोटी बनावट नावे वगळल्याने करदात्यांचे 3 लाख कोटी मोदी सरकारने वाचविल्याचा दावा मोदींनी केला.

काँग्रेस (Congress) काळात 11 लाख कोटींचा इन्फ्रा बजेट भाजपा काळात 44 लाख कोटींवर गेले. त्यामुळे आपसुकच रोजगार निर्मिती झाल्याचा दावा मोदींचा होता. काँग्रेस काळात ‘अटकी, भटकी, लटकी’ योजना राहत होती ती परिस्थिती आता नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. भाजपा आणि काँग्रेस कार्यकाळाचा आकडेवारीसह खेळ मोदींनी मांडून आज विरोधकांना चितपट केल्याचे चित्र होते.

तीस वर्षांत भारत चीन आणि अमेरिकेच्या नंतर तिसरी मोठी आर्थिक शक्ती होईल, असा दावा काँग्रेसने 2014 च्या अंतरिम अर्थसंकल्पात केला होता. पण, दहा वर्षात मोदी सरकारने आर्थिक क्षेत्रात 11 व्या स्थानावरील भारत पाचव्या स्थानावर आणला. तो मोदी च्या तिसऱ्या कार्यकाळात 3 ऱ्या स्थानावर आणू ही मोदींची गॅरंटी असल्याचा दृढ विश्वास मोदींनी आज लोकसभेत व्यक्त केला. ‘नव दिन चले अढाई कौस’ अशी काँग्रेसची स्थिती झाली आहे असा आरोप मोदींनी केला.

दहा वर्षांत घर, रेल्वे ट्रक इलेक्ट्रिफिकेशन, गॅस कनेक्शन, स्वच्छतागृहे या सर्व क्षेत्रात मोदी सरकारचे कार्य हे उल्लेखनीय असल्याचे सांगत काँग्रेस सत्तेला यासाठी 40 ते 100 वर्षाचा कालावधी लागला असता. त्यात तीन ते पाच पिढ्या त्रस्त झाल्या असत्या असा विरोधाभास मोदी उघडकीस आणला.

काँग्रेसने शेतकऱ्यांना 25 लाख कोटी दिले तर मोदी सरकारने दहा वर्षांत सव्वाशे कोटी दिले. त्याच बरोबर ईडीच्या कारवायाचा देखील लेखाजोखा आज मोदींनी काँग्रेस व भाजपा सरकारची तुलना करताना स्पष्टपणे अधोरेखित केला. काँग्रेस काळात ईडीने केवळ पाच हजार कोटी जप्त केल्याचे सांगितले. तर, भाजपाच्या (BJP) कार्यकाळात ईडी ने एक लाख कोटी जप्त केले. हे सांगताना मोदींनी देशातील भ्रष्टाचार संपविण्याचा निर्धार केलाच त्याचबरोबर ज्यांनी देशाचा पैसा खाल्ला त्यांना तो परत द्यावा लागेल असा ईशारा दिला.

अयोध्येत राम मंदिर निर्माण, जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटविणे हे मोदी सरकारचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. 140 कोटी भारतीयांच्या सामर्थ्यावर विश्वास असल्याचे सांगत मोदींनी पुढील तीन वर्षात पुढील एक हजार वर्षांची पायभरणी देशात होईल, असा विश्वास व्यक्त केला. 2024 लोकसभा निवडणूकीत भाजपा 370 पेक्षा अधिक जागा जिंकेल. तर एनडीए 400 च्या पार जागांवर विजयी होईल, असा दृढ संकल्प आज मोदींनी केला.

2024 लोकसभा निवडणुकीचे मुद्देच आज मोदींनी लोकसभेत अधोरेखित केली. काँग्रेस विरोधात लढत लोकसभा विजयाचा निर्धार मोदींनी आज लोकसभेत व्यक्त केला. 17 व्या लोकसभेतील मोदींच्या अंतिम भाषणात 18 वी लोकसभा जिंकण्याची गँरंटी मोदींना असल्याचा प्रचंड आत्मविश्वास दिसून आला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT