Mumbai News : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. या ना त्या कारणाने नेहमीच कुरघोडी केली जात आहे. सरकार स्थापनेवेळीच शिंदे मंत्रिपदासाठी व ठरविक खात्यासाठी अडून बसले होते. मात्र, शिंदेंना ते मिळाले नाही. त्यानंतर पालकमंत्री पदावरून रायगड व नाशिकमध्ये भाजपने कुरघोडी केली आहे.
विशेषतः एकनाथ शिंदेंच्या शिवसेना रायगड व नाशिकच्या पालकमंत्रिपदावर अडून बसल्याने सीएम देवेंद्र फडणवीस यांनी या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली होती. त्यानंतर गेल्या नऊ महिन्याच्या काळात या वादावर भाजपने तोडगा काढला नाही. त्यातच आता 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांना देत भाजपने पुन्हा एकदा एकनाथ शिंदेला डिवचले आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा (Shivsena) डोळा आहे. विशेषतः रायगड जिल्हयात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे वर्चस्व असल्याने रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला हवे आहे. त्यासाठी मंत्री भरत गोगावले इच्छुक आहेत. त्यासाठी गोगावले प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे नाशिकचे पालकमंत्रिपदही शिवसेनेला मिळावे, यासाठी शिवसेना व भाजपमध्ये रस्सीखेच आहे.
गेल्या नऊ महिन्यापासून भाजपला (BJP) नाशिक व रायगडच्या पालकमंत्री पदावर तोडगा काढता आला नाही. गोगावले यांनी रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी देवदर्शन घेत पूजाअर्चा देखील केल्या आहेत. एक तर गोगावले यांना मनासारखे खाते देण्यात आले नाही. दुसरीकडे त्यांना पालकमंत्रीपद दिले जात नसल्याने ते नाराज आहेत.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मधल्या काळात त्यांनी कुठल्याही परिस्थितीत त्यांनी अदिती तटकरे या पदावर नको अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी शिवसेनेने दोन पावले मागे घेत भरत गोगावले यांच्याऐवजी अन्य शिवसेनेच्या मंत्र्याची नियुक्ती करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आदिती यांच्याकडे पद राहावे यासाठी आग्रही आहेत. मध्यंतरी रायगडला आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी गेले होते. त्यामुळे या पदासाठी तटकरे यांचे पारडे जड मानले जात होते.
गेल्या आठ दिवसापूर्वी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत शिंदे यांची बैठक झाली होती. या दोघांच्या बैठकीत देखील पालकमंत्री पदाच्या वादावर तोडगा निघाला नाही. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसापासून या वादाचे भिजत घोंगडे कायम होते.
त्यानंतर यंदा 15 ऑगस्टला फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांना ध्वजारोहण करण्याचा मान मिळावा, अशी अपेक्षा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली होती. मात्र, यावर कोणताच निर्णय झाला नाही. शिवसेना आक्रमक झाली असली तरी दुसरीकडे भाजपने वरचढ असल्याचे दाखवून दिले आहे.
महायुतीमध्ये तीन पक्षाचे सरकार चालवत असताना सीएम फडणवीस यांना नेहमीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसात फडणवीस व अजित पवार यांच्यातील वाढती जवळीकता हा चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच पुन्हा एकदा या निमित्ताने फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर पुन्हा एकदा कुरघोडी करीत रायगडच्या ध्वजारोहणचा मान अदिती तटकरे यांच्याकडे सोपवत एकनाथ शिंदेंना डिवचले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.