Mumbai News : राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आले आहेत. मनसे व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महिनाभरापूर्वीच मुंबईत मोठा मेळावा घेतला होता. या मेळाव्याला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूं राजकीय दृष्टया एकत्रित येतील असा कयास लावला जात आहे. हे दोन बंधू एकत्र येण्याचे मुंबईतील मुस्लिम समाजाने स्वागत केले आहे.
त्यामुळे येत्या काळात मुस्लिम समाज ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभा राहील, असे वाटत असतानाच राज ठाकरे यांनी मागील काळात केलेल्या वक्तव्यावर अजूनही काही मुस्लीम समाजातून विरोधाचा सूर आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम समाजाची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंना सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागेल, अशी चर्चा रंगली आहे.
मुंबईतील मुस्लिम समाजाचे मतदान नेहमीच निर्णायक ठरले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय सर्वच पक्षांना आला आहे. भाजपने (BJP) उद्धव ठाकरे यांना व्होट जिहादच्या मुद्द्यावरून घेरले होते. आता येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे येत्या याकाळात या दोन भावांना निवडणुकीसाठी एकत्र यावे लागणार आहे. विशेष म्हणजे दोन भाऊ एकत्र आल्याचे सर्व राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. त्यासोबतच विविध समाज घटकाने देखील ठाकरे बंधू एकत्र आल्याचे स्वागत केले आहे.
मुंबईतील मुस्लिम समाज हा समाजवादी पक्ष, एमआयएम या दोन पक्षात विभागला गेला आहे. मात्र, गेल्या कशी दिवसापासून मुस्लिम समाज हा एमआयएमपासून दूर जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या याकाळात होत असलेल्या निवडणुकीत हा दुरावत चाललेला मतदार शिवसेनेकडे खेचण्याची संधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाकडे आहे.
ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी या दोन भावाबाबत मुस्लिम समाजात संमिश्र भावना आहेत. राज ठाकरे यांनी मागील काळात मुस्लिम समाजाची भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने त्यांच्याबाबत मुस्लीम समाज त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे राज ठाकरे येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र आल्यानंतरही त्यांच्याविषयी समाजाचा विरोध असू शकतो.
राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुस्लिम समाजासाठी आनंदाचे वातावरण आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला होता. त्यासोबतच आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापलिकेच्या निवडणुकीत मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांच्यासॊबत राहणार आहे.
ठाकरे बंधूंच्या रणनीतीकडे लक्ष
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच दोन भाऊ एकत्र आले आहेत. त्याचा परिणाम विशेषतः मराठी मतांवर होणार आहे. त्यासोबतच मराठी मते काही प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या पारड्यात जाणार आहेत. दुसरीकडे मुस्लीम समाज मात्र एकगठ्ठा मतदान कोणाच्या बाजूने वळणार त्या बाजूने निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्वांचा डोळा मुस्लिम मतांवर असणार आहे. विशेषतः राज ठाकरेंवर असलेल्या नाराजीचा फटका कदाचित उद्धव ठाकरेंना देखील सहन करावा लागू शकतो. त्यामुळे येत्या याकाळात ठाकरे बंधू याबाबत काय रणनीती आखणार याकडे लक्ष लागले आहे.
मुस्लिम समाजाची मतदारसंख्या मोठी
लोकसभा मतदारसंघनिहाय मुस्लिम समाजाची मतदारसंख्या मोठी आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघात 3 लाख 25 हजार मतदार आहेत. दक्षिण मध्यमध्ये 2 लाख 74 हजार तर उत्तर मुंबईत 1 लाख 44 हजार व उत्तर मध्यमध्ये 4 लाख 17 हजार, उत्तर पश्चिममध्ये 3 लाख 59 हजार तर ईशान्य मुंबईमध्ये 2 लाख 47 हजार मतदार आहेत. त्यामुळे मुस्लिम मतदारांची सांख्य मोठी आहे.
लोकसभेला महाविकास आघाडीच्या पाठीशी
लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळेच मुंबईतील लोकसभेच्या सहा पैकी तीन जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकल्या तर काँग्रेस, भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या वाट्याला प्रत्येकी एक जागी विजय मिळवता आला होता.
मुस्लिम समाजाचा 50 प्रभागात प्रभाव
मुंबईतील अणुशक्तीनगर हा मतदारसंघ मुस्लिमबहुल आहे. या मतदारसंघात लोकसभेवेळी अनिल देसाईंना मोठी लीड मिळाली होती. मुंबईत मुस्लिम समाजाचे 20 टक्के मतदार आहेत. महापालिका निवडणुकीत चांदवली, भायखळा, मुंबादेवी, अणुशक्तीनगर, वांद्रे, जोगेश्वरी, गोवंडी, भेंडी बाजार येथील 50 प्रभागात मुस्लिम समाजाचा प्रभाव आहे. त्यासोबतच दहा विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचे 25 टक्क्यापेक्षा अधिक मतदार आहेत. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत बरेच समीकरणे मुस्लिम मतदारांवर अवलंबून असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.