Chhagan Bhujbal Sarkarnama
विश्लेषण

Chhagan Bhujbal News : ...तर आगामी काळात भुजबळ अन् भाजप एकत्र येऊ शकतात!

Arvind Jadhav

OBC Vs Maratha : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधाला सुरूवात केली. अगदी पक्षाला आव्हान दिले. त्यामुळे ओबीसी जनाधार असलेल्या भाजपची चांगलीच पंचाईत झाली. ही बाब भुजबळांनी कधीच हेरली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि भुजबळ एकत्र आल्यास नवल वाटायला नको. किंबहुना भाजपाच्या ओबीसी जनाधाराचा चेहरा भुजबळ होऊ शकतात, अशी शक्यता आता जास्त आहे. (Chhagan Bhujbal And BJP)

भारतीय जनता पक्षाने स्थापनेपासून ओबीसींकडे लक्ष दिले. 'शेटजी' आणि 'भटजीं'चा पक्ष असा बसलेला शिक्का पुसण्याचे काम पहिल्याच टप्प्यापासून सुरू झाले. त्यातूनच भाजपला ओबीसी नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेतृत्व मिळाले. इतर ओबीसी नेते राजकीय मंचावरून एक - एक करीत मागे पडले. मुंडे यांच्या निधनानंतर ओबीसी नेत्याची एक मोठी पोकळी तयार झाली. आज भाजपाकडे ओबीसी नेत्यांची कमी नाही.

मात्र, सडेतोड आणि ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून फार मोठी नावे पुढे येत नाही. त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने भाजपची 'इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी स्थिती झाली. मागील दहा - बारा वर्षांतील भाजपच्या विजयात ओबीसी हा मोठा जनाधार ठरला, हे लक्षात घ्यायला हवे. मागील सात ते आठ महिन्यांपासून आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला. वेळोवेळी बैठका झाल्या.

मात्र मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेवढे प्रयत्न केले तेवढे प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून झाले नाही, अशी टीका होत गेली. त्यातच मराठा आरक्षणाविरोधात थेट भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ अजित पवार गटाचेच ! विशेष म्हणजे भाजपचा जनाधार असलेला ओबीसी समाज पक्षापासून दूर जाऊ नये, याची खबरदारी भाजपाला घ्यावी लागली.

ओबीसी समाजाची नाराजी झेलण्यास भाजपा उत्सुक नाही. तर ओबीसी समाजाला एकसंध धरू शकेल, असा राज्य वा देशपातळीवरील नेता भाजपला अद्याप उभा करता आलेले नाही. मुंबईतील बैठकीसाठी आमदार गोपीचंद पडळकर कालच मंत्री छगन भुजबळांसोबत डेरेदाखल झाले आहेत, हीच ती भाजपासाठी जमेची बाजू! पण, भुजबळांप्रमाणे लढाऊ ओबीसी नेत्याचे वलय निर्माण करण्यात पडळकर फारच पिछाडीवर आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील दोन लोकसभा निवडणुकींमध्ये भाजपाच्या विजयात ओबीसी समाजाचा वाटा सर्वात मोठा होता. त्यामुळे ओबीसींना दुखावून थेट मराठा आरक्षणास हात घालणे भाजपने नेहमीच टाळले. मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाज पक्षापासून दूर गेल्यास त्याचा फटका भाजपला निश्चित बसू शकतो, याची जाणीव देवेंद्र फडणवीसांना नक्कीच आहे.

गोपीनाथ मुंडे, माळी समाजाचे ना. स. फरांदे, धनगर समाजाचे आण्णा डांगे, प्रमोद महाजन, विश्वास गांगुर्डे, प्रकाश जावडेकर, भाऊसाहेब फुंडकर, चिंतामण वनगा अशी पक्षाच्या सुरूवातीच्या काळातील नावे महत्वाची आहे. ही नावे बहुजन नेतृत्वाची प्रतीक होती. यातील गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाची मोट बांधून आपले राजकीय मूल्य मोठे केले होते. मात्र, 2014 मध्ये त्यांचे अपघाती निधन झाले.

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा पुढे चालवला. पण, त्यांना मर्यादा आल्या. पक्षीय राजकारण, भावबंधकी या पुरतेच त्यांचे राजकारण मर्यादितच राहिले. दुर्दैवाने भाजपाने ओबीसी चेहऱ्याच्या नेतृत्वाकडे दुर्लक्षच केले. आज मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे भाजपला ही सल नक्कीच जाणवत असणार. आता भाजपाला ओबीसी समाजाला एकत्र ठेवणारा नेता पुढे आणावा लागणार किंवा ओबीसींसाठी लढाई करणाऱ्या भुजबळांना सोबतीला घ्यावे लागणार, अशी चिन्हे आहेत.

किंबहुना देवेंद्र फडणवीसांनी अशी तयारी सुरू देखील केल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ओबीसी लढ्यात अप्रत्यक्ष भाजपकडून रसद पुरविली जाते आहे. मुंबईतील मंत्री छगन भुजबळ यांच्या घरी झालेल्या बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर हजर राहिलेत. भाजपाच्या नेत्यांना कोणतीही माहिती न देता पडळकर भुजबळांच्या खांद्याला खांदा लावून बसणे शक्य नाही. ओबीसी जनाधार कायम राखण्यासाठी भाजपा भुजबळांना सोबत घेऊ शकते.

ओबीसी समाजासाठी पुढे येण्याची भाषा करणे आणि त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरणे यात अंतर असते. भुजबळांना शरद पवारांनी त्यावेळी भक्कम पाठबळ दिले. एक प्रकारे सरकारी मदतच भुजबळांच्या दिमतीला होती. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. भुजबळांना पाठबळ देण्यासाठी फक्त भाजप भक्कम पर्याय ठरतो. दुसरीकडे भुजबळांचे आताचे वय लक्षात घेता त्यांना राज्यसभेची उमेदवारी, मंत्रिपद आणि समीर भुजबळांचे पुनर्वसन झाल्यास भुजबळांना या राजकीय तहातून फायदाच होणार आहे.

त्याचमुळे की काय, पण भुजबळांनी पक्षालाच आव्हान देण्याची तयारी दर्शवली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भुजबळांनी व्यक्त केलेले मत वैयक्तिक असल्याचे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले होते. या संदर्भात भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला असता भुजबळांची देहबोली अचानक आक्रमक झाली. आपल्याला याचा फरक पडणार नाही, ज्यांना सोबत यायचे ते येतील अशी पक्षालाच खुंटीवर टांगण्याची भाषा भुजबळांनी केली.

आपण काय बोलतोय याची जाणीव भुजबळांना नक्कीच आहे. त्याचे परिणाम डोळ्यांसमोर ठेऊनच भुजबळ लढाईची भाषा करतात. पडद्याआड सुरू असलेल्या घडामोडी लवकरच पुढे येतील. त्यामुळे तुर्तास शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांबरोबर गेलेले भुजबळ ओबीसी लढ्यासाठी भाजपात दाखल झाले तर नवल वाटायला नको! तसेच यातून भाजपाचा आणि भुजबळांचा ओबीसी लढा आणखी सोप्पा नक्कीच होईल.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT