Congress Party Sarkarnama
विश्लेषण

Congress Party News : काँग्रेस नेत्यांचा ‘सुंभ जळाला तरी पीळ काही सुटेना’!

Dilip Kumar Sananda Vs Tejendra Singh Chavan : विदर्भातील खामगाव येथे रविवारी रात्री काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये आधी शाब्दिक चकमक आणि नंतर हाणामारी झाली. पक्षाच्या पडत्या काळात तरी काँग्रेसच्या काही नेत्यांमधील सरंजामी वृत्ती कमी होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

अय्यूब कादरी

काँग्रेसमध्ये जीव राहिला नाही, नेते रस्त्यावर उतरत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे... अशा आशयाची वाक्ये सातत्याने कानावर पडत आहेत. यावरून काँग्रेसवर टीकाही केली जाते. मात्र, फरक पडेल ती काँग्रेस कशी? लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आता सक्रिय झाल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी मात्र नको त्या पद्धतीने सक्रिय झाल्याचेही दिसत आहे.

ही निवडणूक म्हणजे काँग्रेसच्या (Congress) अस्तित्वाची लढाई आहे. असे असताना विदर्भातील खामगाव (Khamgaon) येथे काँग्रेस नेत्यांमध्ये लाजिरवाणा प्रकार घडला. दोन मोठ्या नेत्यांमध्ये हाणामारी झाली. गटबाजी प्रत्येक पक्षात असते, मात्र नेत्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडणे दुर्दैवीच म्हणावे लागेल. तिकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) पक्षाला वाढविण्यासाठी, सत्ता मिळविण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. मुद्द्याचे प्रश्न विचारून सत्ताधाऱ्यांची कोंडी करत आहेत आणि त्यांचे नेते इकडे हाणामारी करत आहेत. काँग्रेसचे राज्यातील नेते पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी खरेच गंभीर आहेत का, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वर्षानुवर्षे सत्तेत राहिल्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या अंगी एक प्रकारची सरंजामी वृत्ती भिनल्याचा आरोप सतत केला जातो. काँग्रेसच्या काही नेत्यांनी आपल्या वागण्यातून त्याची प्रचीतीही वेळोवेळी दिली आहे. गेल्या दहा वर्षांपासून देशात भाजपची सत्ता आहे. विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावण्यात राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवरील काँग्रेसचे अनेक नेते कमी पडले आहेत. काही नेते तर असे आहेत की गेल्या दहा वर्षांत एकदाही रस्त्यावर उतरले नाहीत. प्रचंड महागाई, बेरोजगारी, शेतमालाला भाव नसणे, शेतकऱ्यांना मदत न मिळणे, असे अनेक मुद्दे सरकारच्या विरोधात लढण्यासाठी होते. मात्र, बहुतांश काँग्रेस नेत्यांनी ही संधी वाया घालवली.

जनतेच्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्याऐवजी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शांत राहणे पसंत केले. लढायची वेळ आली की काँग्रेसच्या काही नेत्यांनी शस्त्रे खाली टाकून भाजपमध्ये प्रवेश केला. अशा लोकांमध्ये स्थान असलेल्या नेत्यांच्या मागे भाजपनेही व्यवस्थितपणे चौकशांचा ससेमिरा लावला. काही नेत्यांची आर्थिक नाकेबंदी केली. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्रिपद, मंत्रिपदासह पक्ष संघटनेत महत्त्वाची पदे दिलेले नेते भाजपवासी झाले. उभी हयात काँग्रेसमध्ये काढलेल्या या नेत्यांचे खरे रूप नागरिकांना कळले. या नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची संधी मिळालेली असताना काँग्रेस नेत्यांमध्ये काही ठिकाणी गटबाजी उफाळून येत आहे. त्यातून हाणामारीसारखे प्रकार घडत आहेत.

खामगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी रविवारी रात्री जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्यासह राज्यातील आणि स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती. उद्धव ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर नेते, कार्यकर्ते परत निघाले. खामगावचे काँग्रेसचे आमदार दिलीपकुमार सानंदा (Dilip Kumar Sananda) हे सभास्थळावरून बाहेर पडत असताना समोरून काँग्रेस सेवादलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण (Tejendra Singh Chavan) यांची कार आली. त्यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली. पाहतापाहता त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. प्रत्येक पक्षात गटबाजी असते, मात्र गटबाजीतून थेट नेत्यांमध्ये हाणामारीचा प्रकार धक्कादायक म्हणावा लागेल.

गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात सत्तेत नसल्यामुळे काँग्रेसला घरघर लागली आहे. त्यातच अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राहुल गांधी यांची धडपड सुरू आहे आणि काँग्रेसच्या काही नेत्यांना मात्र त्याचे सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. पक्षाच्या, स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असतानाही हे नेते सरंजामी वृत्तीचे प्रदर्शन जाहीरपणे करू लागले आहेत. यातून बाहेर पडल्याशिवाय काँग्रेसची स्थिती बदलणार नाही, हे नेत्यांनी वेळीच लक्षात घ्यायला हवे.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT