Raksha Khadse_Eknath Khadse -Rohini Khadse Sarkarnama
विश्लेषण

Jalgaon Politics : सुनेविरोधात प्रचाराला नकार देणारे खडसे मुलीच्या विरोधात प्रचार करतील का?

Eknath khadse News : मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्याशी खडसेंचे राजकीय संबंध महाराष्ट्राला ज्ञात आहेत. अशा स्थितीत खडसे भाजपमध्ये परतल्यास या दोन मंत्र्यांची भूमिका काय असेल? ते खरोखर आपल्या स्वभावाला मूरड घालतील का?

Sampat Devgire

Jalgaon, 07 April : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप अर्थात स्वगृही परतण्याचे निश्चित केले आहे. खडसे यांच्या या प्रवेशाने अनेकांची मोठी कोंडी होणार आहे. विशेषतः गिरीश महाजन खडसेंची सख्य करू शकतील का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपमध्ये सध्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा शब्द अंतिम मानला जातो. भाजपवर महाजन यांची पकड आहे. भाजपच्या महाजन विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे अशी राजकीय विभागणी झालेली आहे. ही सर्व समीकरणे काल एका फटक्यात बदलली. खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार आहेत. त्यातून भाजपसाठी व खडसे यांच्या भावी राजकारणासाठी अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रवेशाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीप्रमाणे खडसे यांनी आपली राजकीय सोय देखील करून ठेवली आहे. सून रक्षा खडसे ()Raksha Khadse आधीच भाजपमध्ये आहे. आता ते स्वतः भाजपमध्ये परततील. मात्र मुलगी रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहतील. त्यातून काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात.

भाजपने खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्या विरोधात उमेदवारी करण्यास एकनाथ खडसे यांनी नकार दिला होता. एवढेच नव्हे तर मी रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचार करणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. आता ते भाजपमध्ये जात आहे. मुक्ताईनगर मतदार संघातून रोहिणी खडसे इच्छुक आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यास खडसे यांची भूमिका काय असेल? त्यांना भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागेल. ते कन्या रोहिणी खडसे यांच्या विरोधात प्रचार करतील का? हा अतिशय बोलका प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) हे खडसे यांचे कट्टर विरोधक आहेत. प्रत्येक विषयावर ते खडसे यांच्या विरोधात वक्तव्य करतात. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत त्यांनी मंदाकिनी खडसे यांचा पराभव करून ही संस्था आपल्या ताब्यात घेतली. त्यावरून खडसे आणि चव्हाण यांच्यात सतत वाद होत असतात. हे वाद आता अचानक मिटतील का? असे बोलले जाते.

या मतदार संघात सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आमदार आहेत. युतीच्या जागा वाटपात नैसर्गिक न्यायाने ही जागा चंद्रकांत पाटील यांना जाईल. त्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघावरून चंद्रकांत पाटील आणि खडसे यांच्या राजकीय वादाचे एक नवे पर्व सुरू होऊ शकेल. चंद्रकांत पाटील यांनी महायुतीत असून देखील रक्षा खडसे यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. अशा स्थितीत चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीआधीच आपली वेगळी वाट शोधावी लागेल. कदाचित ते पुन्हा उद्धव ठाकरे गटाकडे जाऊ शकतात.

मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याशी खडसेंचे राजकीय संबंध महाराष्ट्राला ज्ञात आहेत. अशा स्थितीत खडसे भाजपमध्ये परतल्यास या दोन मंत्र्यांची भूमिका काय असेल? ते खरोखर आपल्या स्वभावाला मूरड घालतील का? यापेक्षाही खडसे यांचे भारतीय जनता पक्षात परतणे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांची अडचण करणारे ठरणार आहे. त्यामुळे खडसे भाजपमध्ये परतणे हा, जळगावच्या राजकारणात एक नवे वादग्रस्त पर्व ठरते की काय अशी स्थिती आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT