Jayant Patil Politics Against Nishikant Patil, Samrat Mahadik, Ashok Pawar, and Gaurav Nayakwadi sarkarnama
विश्लेषण

महाडिक, निशिकांतदादा अन् नायकवडी... निवांत झालेले जयंत पाटील आता एकालाही सुट्टी देणार नाहीत!

Jayant Patil Politics : जयंत पाटील यांनी अखेर आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांना आता आपल्या मतदारसंघात पूर्ण वेळ लक्ष घालता येणार आहे. यामुळे महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्थानिकच्या तोंडावर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

Aslam Shanedivan

थोडक्यात बातमी :

  • जयंत पाटलांचा राजीनामा: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  • मतदारसंघावर लक्ष केंद्रित: या राजीनाम्यामुळे जयंत पाटील यांना आता आपल्या मतदारसंघात पूर्ण वेळ लक्ष घालता येणार आहे.

  • महायुतीसमोर आव्हान: त्यांच्या या निर्णयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे राजकीय आव्हान निर्माण झाले आहे. यासह निशिकांत पाटील, सम्राट महाडिक, अशोक पवार आणि गौरव नायकवडी यांना अधिक मेहनत करावी लागेल.

Sangli News : जयंत पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मागच्या सात वर्षांपासून ते पदावर होते. सात वर्षांच्या काळात पाटील यांनी राज्यात एवढे लक्ष घातले की त्यांचे इस्लामपूरकडे जवळपास दुर्लक्ष झाले होते. अजित पवार यांच्या बंडानंतर तर त्यांच्या खांद्यावर अधिक जबाबदारी येऊन पडली. याचा फटका त्यांना 2024 विधानसभा निवडणुकीत बसला. एरव्ही आरामात निवडून येणाऱ्या पाटील यांना यावेळी प्रचंड संघर्ष करावा लागला. गोळी अगदी त्यांच्या कानावरून गेली. (ayant Patil's resignation as the Nationalist Congress Party Sharadchandra Pawar state president will allow him to focus full-time on his constituency)

राज्याची जबाबदारी असल्याने जयंत पाटील यांचे इस्लामपूरमधील, त्यांच्या संस्था, दूध संघ, कारखान्यातील लक्ष कमी झालेले. त्यातून ओढावलेल्या नाराजीचा परिणाम त्यांच्या मताधिक्यावर झाला. ही संधी साधून महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी एकाच तालुक्यातून जिल्हाध्यक्ष दिले. यामुळे जयंत पाटील यांची कोंडी झाल्याचे बोलले जात होते. पण आता जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ते इस्लामपूरमध्ये अधिक लक्ष घालताना दिसून येतील. पुढील काळात ते मतदारसंघ पुनर्बांधणी करताना दिसतील. याशिवाय जिल्ह्यातील राजकारणातही त्यांचे लक्ष वाढेल. एकीकडे त्यांनी राजीनामा दिल्याने त्यांचे राजकीय वजन कमी झाले अशी चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या मनात मात्र धडकी भरली असणार.

आगामी स्थानिकसाठी जिल्ह्यात जोरदार मोर्चे बांधणी केली जातेय. यात महायुतीने आघाडी घेतली आहे. महायुतीतील भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेनं मोठी रणनीती आखली होती. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जयंतरावांना ट्रप करण्याचा मोठा प्लॅन आखत तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांच्याच मतदारसंघातले नियुक्त केले.

अजितदादांनी कट्टर विरोधक नेमला :

भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले निशिकांत पाटील जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांनी दोनदा जयंत पाटील यांना कडवी झुंज दिली होती. 2024 चा निकाल तर जयंत पाटील यांना विचार करायला लावणारा होता. त्यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून केवळ 13 हजार 23 मतांनी विजय मिळवत आपला गड शाबूत ठेवला. निशिकांत पाटील यांनी सर्व गटांना सोबत घेवून निकराची झुंज त्यांना विजयाच्या जवळ जवळ घेवून गेली होती. यामुळे ते आता स्थानिकसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यांनी जयंत पाटील यांच्या विरोधातील नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची मोट बांधण्यास सुरूवात केली असून चार ते पाच माजी आमदारांसह माजी खासदार संजयकाका पाटील यांना आपल्या सोबत घेतले आहे. यामुळे स्थानिकला जयंत पाटील यांच्यासाठी आव्हान निर्माण केले आहे.

सम्राट महाडिक :

भाजपने देखील जयंत पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात अडकवण्यासाठी सम्राट महाडिक यांची नियुक्ती केली. सम्राट महाडिक देखील जयंत पाटील याचे कट्टर विरोधक असून स्थानिकसाठी ते भाजपची मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षापासून शिराळा तालुक्यात भाजप पक्ष वाढीसाठी सम्राट महाडिक प्रयत्न केले आहेत. यामुळे भाजपने त्यांना जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पदाची जबाबदारी दिली आहे. वाळवा शिराळा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांचे पारंपारिक विरोधक म्हणून माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निशिकांत पाटील, भाजपचे विक्रम पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनंतराव पवार, महात्मा गटाचे गौरव नायकवडी, माजी नगरसेवक वैभव पवार अशी मोठी यादी आहे. या सर्वांची मोट बांधण्याचे काम सम्राट महाडिक करत आहेत.

गौरव नायकवडी :

इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना शह देण्यासाठी भाजप - शिवसेनेसह अजित पवार यांची राष्ट्रवादी हे पक्ष कमालीचे एकवटले आहेत. तिन्ही पक्षांनी जयंतरावांनी खिंडीत गाठण्यासाठी एकाच तालुक्यातील जिल्हाध्यक्ष दिले आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं डबल गेम खेळत तालुक्यातील जयंत पाटील यांचे पारंपारिक विरोधी असणाऱ्या हुतात्मा गटाचे नेते गौरव नायकवडी यांना पाठबळ दिले आहे. सध्या त्यांच्याकडे शिवसेना जिल्हा समन्वयक पद असून याच्या माध्यमातून ते येथे निधी आणण्याचे काम करत आहेत.

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक

जयंत पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सहकारी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी काहीच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला होता. यामुळे जयंत पाटील यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात होते. अजित पवार यांनी नाईक यांच्या रूपाने जयंत पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण केले. आतातर नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केलीय. यामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी मजबूत होण्यासह 48 गावांतील नाईक गटाला ताकद मिळालीय.

आनंदराव पवार :

जयंत पाटील यांचे राजकारण संपवण्यासाठी शिवसेनेचे आनंदराव पवार देखील संधीची वाट पाहत आहेत. ते देखील जयंतराव यांचे कट्टर विरोध मानले जात असून एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात त्यांना जिल्ह्यात ताकद दिली आहे. त्यांना शासनाच्या माध्यमातून आणि जिल्हा नियोजन समितीतून मतदारसंघातील कामांना निधी उपलब्ध करून दिला जात आहे.

इद्रिस नायकवडी :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना इद्रिस नायकवडी सांगलीचे महापौर होते. पण त्यांची जयंत पाटील यांच्याशी उडालेले खटके आणि पुत्राचा शाही विवाहाच्या कारणाणे हकालपट्टी करण्यात आली होती. हाच राग त्याच्या डोक्यात आजही आहे. यामुळे नायकवडी यांनी अजित पवार यांच्याबरोबर जात जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्के देण्याचे काम केलं आहे. अनेक प्रवेश आपल्या पक्षात घडवून आणले आहेत.

विधानसभेलाच जयंत पाटील यांना रोखण्याची रणनीती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आखली होती. त्यांनी तिन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना ताकद दिली आहे. एकीकडे जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदामुळे मतदारसंघासह सांगली जिल्ह्यात लक्ष घातला येत नव्हते. त्यामुळे त्यांच्यासह जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मतधिक्य घटले होते. तर अनेक ठिकाणी उमेदवारांचा पराभव झाला होता. पण आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे ते पूर्ण वेळ मतदारसंघासह जिल्ह्यास देऊ शकतात.

जयंत पाटील यांच्या आत्ताच्या या निर्णयामुळे आगामी स्थानिकसाठी पक्षाला मोठी संधी मिळणार असून यासाठी काँग्रेस देखील आग्रही आहे. काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी जयंत पाटील यांच्याकडे युतीसह त्यांनीच जिल्ह्यात युतीचे नेतृत्व करावे अशी मागणी केली आहे. यामुळे आता आगामी स्थानिकला काँग्रेसबरोबर युती होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास महाडिक, निशिकांतदादा अन् नायकवडी यांना टप्प्यात आणून जयंत पाटील त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील अशीच चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

प्र. जयंत पाटील यांनी कोणत्या पदाचा राजीनामा दिला आहे?
उ: त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

प्र. या राजीनाम्यामुळे काय बदल होणार आहेत?
उ: जयंत पाटील आता मतदारसंघात अधिक सक्रिय होणार असून त्यामुळे महायुतीला स्थानिक पातळीवर मोठं आव्हान निर्माण होईल.

प्र. कोणते स्थानिक नेते प्रभावित होणार आहेत?
उ: गौरव नायकवडी, निशिकांत पाटील, सम्राट महाडिक व अशोक पवार यांना या राजकीय बदलाचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT