Solapur, 10 May : माढा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाची चावी पुन्हा एकदा माळशिरसच्या हाती असणार आहे. मात्र, फलटण (१५ हजार ४०१) आणि माण खटावमध्ये (२२ हजार ७६८) गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात जाणार, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. विशेषतः मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांची युती ‘तुतारी’ला किती लीड देणार, यावरच मोहिते पाटील यांच्या विजयाचे समीकरण ठरणार आहे. कारण, फलटण आणि माणमध्ये वाढलेली मतेही विचारात घ्यावी लागतील. त्यातच भाजपने शेवटच्या टप्प्यात लावलेली ‘ताकद’ विशेष लक्षणीय होती. त्यामुळे माळशिरस मोहिते पाटलांना किती लीड देणार आणि माण-खटाव, फलटण निंबाळकरांना किती हात देणार, यावरच माढ्याचा पुढचा खासदार ठरणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha constituency ) भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel mohite Patil) यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई झाली. माढ्याची निवडणूक अनेक अर्थाने गाजली. मोहिते पाटील यांची बंडखोरी, शिवरत्न बंगल्यावर प्रथम रामराजेंसोबत, तर त्यानंतर शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत रंगलेली डिनर डिप्लोमसी विशेष चर्चिली गेली. त्यानंतर निवडणूक ऐन मध्यावर आली असताना पवारांचे कट्टर समर्थक अभिजित पाटील अध्यक्ष असलेल्या विठ्ठल साखर कारखान्यावर कारवाई झाली. त्यानंतर पाटलांचा भाजपला पाठिंबा, बॅंकेची जप्तीची कारवाई मागे घेणे, हा इतिहास सर्वश्रूत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रसाद लाड-नरेंद्र पाटील जोडीचे ठाण
माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांची तुतारी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. मात्र, भाजपकडूनही तेवढ्याच ताकदीने बेरजेचे राजकारण करण्यात आले. अगदी शेवटच्या टप्प्यात प्रसाद लाड आणि नरेंद्र पाटील हे माढ्याच्या रणांगणात संपूर्ण अस्त्रांनिशी उतरले होते. नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणाची नकारात्मक बाजू खोडून काढण्यासाठी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला. मनोज जरांगे पाटील यांचा सोलापूरमध्ये दौरा होताच नरेंद्र पाटील हे माढा लोकसभा मतदासंघात मराठा आरक्षणाचा प्रभाव जाणवणाऱ्या माढा, सांगोला आणि करमाळ्यात ठाण मांडले. एकीकडे मैदानात लढाई लढली जात असताना अनेकांना साम-दाम-दंड-भेद नीतीने कामाला लावले.
माढ्यात मतदान घटले
भाजपच्या ‘ट्रॅप’मध्ये माळशिरस आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजाचे नेते शेवटच्या क्षणी गळाला लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे सांगोल्यात ‘बरोबरी’ची कुस्ती होण्याची चर्चा आता रंगू लागली आहे. माढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा धग जाणवत होती. ‘शिंदे-सावंत’ युतीनंतरही मागील २०१९ च्या निवडणुकीतील मतदानाचे आकडे गाठण्यात अपयश आले आहे. माढ्यात मागील निवडणुकीपेक्षा यंदा सुमारे तेराशे मतदान कमी झाले आहे. पण, शिंदे-सावंत युती माढ्यातून निंबाळकरांना किती लीड देणार याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
करमाळ्यात छुपी मदत निर्णायक
करमाळ्यात संजय शिंदे, रश्मी बागल आणि माजी आमदार जयवंतराव जगताप या त्रिकुटापुढे राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार नारायण पाटील यांचे आव्हान होते. मतदानाच्या चार दिवस आधी रश्मी बागल यांच्या मकाई कारखान्याला झालेली मदत आणि महायुतीमधील दोन नेत्यांची एका हॉटेलमधील बैठकही विशेष चर्चेत होती. मात्र, काही नेत्यांची छुपी मदत, तसेच स्थानिक पण ताकदवान नेत्यांमुळे करमाळ्यात ‘तुतारी’ लीड घेईल, अशी चर्चा आहे.
निंबाळकरांची भिस्त ‘फलटण-माण’वर
फलटण हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा घरचा विधानसभा मतदारसंघ आहे. शेवटच्या सभेत ती ताकद निंबाळकरांनी दाखवली. भूमिपूत्र असल्याचा फायदा निंबाळकरांना होऊ शकतो. शेवटच्या दिवशी ‘कमळ’चा दरवळ वाढल्याची चर्चा आहे. मात्र, रामराजेंचा असणारा विरोधही दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे फलटण आणि शेजारच्या माण-खटाव मतदारसंघावरच निंबाळकरांची भिस्त बऱ्यापैकी अवलंबून आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या माण खटावमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान झाले आहे, त्यामुळे फलटण आणि माण खटावमधील लीडवरच निंबाळकरांची लढाई अवलंबून असणार आहे.
जानकर-मोहिते पाटलांची ताकद दिसेल का?
सर्वाधिक चर्चा माळशिरस विधानसभा मतदारसंघाची होती. कारण गेल्या निवडणुकीत एक लाखाहून अधिक मताचे लीड मोहिते पाटलांनी निंबाळकरांना दिले होते. त्यातच जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्याने मोठ्या मताधिक्याची चर्चा आहे. मात्र, दोन प्रबळ गट एकत्र आल्यानंतरही १६ हजार ६४३ मतदान गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक झाले आहे. काही पॉकेट्समध्ये ताकद राखून असलेल्या नेत्यांना गळाला लावण्याचे यशस्वी काम निंबाळकरांनी केल्याचे दिसून आले, त्यामुळे माळशिरसमध्ये मोहिते पाटील किती लीड घेणार आणि निंबाळकर हे मागील विरोधक संजय शिंदे यांच्यापेक्षा किती अधिकची मते घेतील, यावरच माढ्याचा निकाल अवलंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.