Mumbai News : गेल्या दहा दिवसापासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा पहिला आठवडा उलटला आहे. मात्र, विरोधी पक्षाकडे कमी झालेल्या संख्याबळामुळे आक्रमकपणाच शिल्लक राहिलेला नाही. पहिल्या आठवड्यात धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी विरोधक बॅकफूटवरच तर बिनधास्त सत्ताधारी असे अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातील विधानसभेतील चित्र होते. मात्र, आता अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर विरोधकाकडून महायुती सरकारची कोंडी केली जात आहे.
लाडकी बहीण योजना आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आधीच बॅकफूटवर असणाऱ्या महायुती सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच आता विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार करण्यात येत असल्याचा दावा सत्ताधारी भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला. त्यामुळे येत्या काळात सत्ताधारी पक्षासमोरील अडचणी वाढणार आहेत.
अधिवेशन काळात भाजपचे (Bjp) आमदार परिणय फुके यांनी मोठा बॉम्ब फोडत सत्ताधारी महायुती सरकारच्या अडचणी वाढवल्या आहेत. आमदार फुके यांनी खळबळजनक दावा केल्याने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना केला. त्यामुळे आता येत्या काळात या प्रकरणाची चौकशी केल्यास सत्य समोर येणार असल्याने सत्ताधारी व विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप करत भाजपचे आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला. याबाबत त्यांनी एजंटसोबत झालेल्या कॉलची ऑडिओ क्लिप विधीमंडळात सादर केली. प्रश्न का लावायचा नाही? लावल्यानंतर काय होणार? अशा धमक्या या ऑडिओ क्लिपमध्ये देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे फुकेंच्या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे .
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार होतो. विरोधीपक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते यात सहभागी आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, ॲाडीओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे, अशी माहिती देखील फुके यांनी दिली. ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल धारकांवर राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या चुकांबाबत काही कारवाया झाल्या होत्या. त्या कारवाया परत करण्याची धमकी देऊन परत लक्षवेधी लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करू, तुमची आम्ही राईस मिल बंद करू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, अशा प्रकारच्या धमक्या देऊन राईस मिल धारकांकडून पैशांची मागणी करण्यात आली, असेही फुके यांनी म्हटले आहे.
या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राज्य सरकारकडून ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी झाल्यानंतर सर्वच सत्य समोर येणार आहे. या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपमधून आवाजाची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर फॉरेन्सिक रिपोर्ट येणार आहेत. याची सखोल चौकशी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत याबाबत कोणाचेही नाव घेता येणार नाही.
ऑडिओ क्लिपमधील संवाद नेमका काय? याची तपासणी केल्यानंतर बऱ्याच बाबी पुढे येणार आहेत. यापूर्वी देखील लक्षवेधी लावण्याचा संदर्भात पैशांची देवाणघेवाण झाली होती, त्याचे देखील या ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण असल्याचे सांगितले जात आहे. त्याची पडताळणी केल्यानंतरच याबाबत बोलणे उचित ठरणार आहे. मात्र, एकंदरीतच लक्षवेधी लावण्यासाठी जर पैशांचा व्यवहार होत असेल तर गंभीर आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकारामुळे अडचणीत भरच पडणार असल्याचे चित्र आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.