Lok Sabha Election  Sarkarnama
विश्लेषण

Special Analysis : महायुती की महाविकास आघाडी ? अखेरच्या टप्प्यात 'हे' मुद्देच ठरणार कळीचे !

अय्यूब कादरी

Mumbai News : शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना त्यांच्या भाषेत गद्दार असे संबोधले जाते. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील सहाही मतदारसंघांच निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशीच निवडणूक झाल्याची चर्चा आहे. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याद्वारे या मुद्द्याचा सोक्षमोक्ष लागणार आहे. कल्याण, ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. नाशिक, दिंडोरी, धुळे मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी सत्ताधाऱ्यांना रडवतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी झाली. सायंकाळी पाचपर्यंत राज्यातील 13 जागांवर 48.66 टक्के मतदान झाले होते. दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक 57.06, तर कल्याण मतदारसंघात सर्वात कमी 41.70 टक्के मतदानाची नोंद झाली.

आठ राज्यांतील 49 जागांसाठी 56.68 टक्के मतदान झाले. मतदानाची ही टक्केवारी सायंकाळी पाचपर्यंतची आहे. नाशिक, धुळे, दिंडोरी या कांदा मुख्य पीक असलेल्या मतदारसंघांसह मुंबईतील सहा आणि पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे अशा राज्यातील एकूण 13 मतदारसंघांत मतदान झाले. (Special Analysis)

आतापर्यंत राज्यात झालेल्या चार टप्प्यांत 65 टक्क्यांपेक्षा कमीच मतदान झाले आहे. नेहमीप्रमाणे पश्चिम बंगालने मतदानात आघाडी घेतली. पाचव्या टप्प्यातही या राज्यात दुपारी तीनपर्यंत 62.72 टक्के मतदान झाले होते. देशाची यावेळपर्यंतची टक्केवारी 50.42 होती. मुंबईतील काही मतदान केंद्रांवर, विशेषतः महाविकास आघाडीचे (MVA) मतदार अधिक असलेल्या ठिकाणि प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे (Shivsena) (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. मतदान झाल्याशिवाय अधिकाऱ्यांना सोडू नका, असे आवाहन त्यांनी केले. आधीच्या चार टप्प्यांप्रमाणेच या पाचव्या टप्प्यातही मतदारांचा फारसा उत्साह दिसून आला नाही.

देशात कांद्याची टंचाई निर्माण होईल, या भीतीने केंद्र सरकारने गेल्यावर्षींच्या अखेरीस कांदा निर्यातबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र केंद्र सरकारची ही भीती अनाठायी होती, असे शेतमाल तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नाशिक, दिंडोरीच नव्हे, तर राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघ असे आहेत जेथे कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील 80 टक्के क्षेत्रावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. निर्यातबंदी लागू झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. त्याची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत पाहायला मिळाली. मोदींचे भाषण सुरू असताना एकाने कांदा निर्यातबंदीचा प्रश्न उपस्थित केला. मात्र मोदी त्यावर काहीही बोलले नाहीत. उलट त्या शेतकऱ्यालाच बाहेर काढण्यात आले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्या शेतकऱ्याचे कौतुक केले होते. तो आपल्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर मला त्याचा अभिमान आहे, असेही ते म्हणाले होते.

कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना आवडलेला नाही. मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वक्तव्याने शेतकऱ्यांची नाराजी आणखी वाढवली. कांदा हा एकमेव प्रश्न लोकसभा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकत नाही. केंद्र सरकारने केलेल्या कामांचा प्रचार मतदारांमध्ये जाऊन करा, असे बावनुकुळे कार्यकर्त्यांना म्हणाले होते.

माढा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले. त्यावेळी एका मतदाराने कांद्याने इव्हीएमचे बटन दाबल्याचे छायाचित्र व्हायरल झाले होते. नाशिक मतदारसंघात बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्यासह संजय चव्हाण आणि अन्य काही मतदार गळ्यात कांद्याच्या माळा घालून मतदानासाठी आले होते. दिंडोरी मतदारसंघातही अनेक मतदारांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केले.

नाशिक, धुळे, दिंडोरी, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, माढा, धाराशिव, शिरूर, अहमदनगर, शिर्डी या 11 लोकसभा मतदारसंघांत कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कांदा उत्पादकांनी सत्ताधाऱ्यांवर राग व्यक्त केला किंवा नाही, हे चार जून रोजी, म्हणजे निकालाच्या दिवशी लक्षात येईल.

मुंबईतील सहाही मतदारसंघांत चुरशीची लढत झाली. मुंबईत उद्धव ठाकरे यांची कसोटी लागणार आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे त्यांना मुंबईत मोठी सहानुभूती असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच भाजपने राज ठाकरे यांना सोबत घेतले. राज ठाकरे यांनी ध्रुवीकरणाची भाषा बोलून मराठा मते महायुतीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी मुंबईत गद्दार विरुद्ध निष्ठावंत या मु्द्द्याभोवतीच निवडणूक फिरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ठाणे मतदारसंघातही महाविकास आघाडीतील शिवसेनेचे राजन विचारे आणि महायुतीतील शिवसेनेचे नरेश म्हस्के ही लक्षवेधी लढत होत आहे. शेजारच्या कल्याण मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लढत ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्याशी होत आहे. या दोन्ही मतदारसंघांत मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कल्याण मतदारसंघातील 80 हजार आणि भिवंडीत एक लाखाहून अधिक मतदारांची नावे मतदारयाद्यांतून वगळण्यात आल्याचे ऐन मतदानाच्या दिवशी उघडकीस आले. (Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT