Pankaja Munde-Chandrakant Patil-Mahadev Jankar Sarkarnama
विश्लेषण

Pankaja Munde's CM Post : जानकरांचा शब्द...पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्रिपद अन्‌ चंद्रकांतदादांची सारवासारव...

Vijaykumar Dudhale

Maharashtra Politics : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या विधानामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्रिपद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत 2014 मध्ये वादंग उठले होते. ते वादंग खुद्द पंकजा यांनी केलेल्या विधानातूनच निर्माण झाले होते. आता जानकर यांच्या ताज्या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे. (Mahadev Jankar's Statement & Pankaja Munde's Chief Ministership is again in discussion)

माझ्या पक्षाचे जेव्हा 145 आमदार निवडून येतील, तेव्हा मी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेन, असे आमदार जानकर यांनी म्हटले आहे. त्यानंतर वेगवेगळ्या स्तरावरून मुंडे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ‘(स्व.) गोपीनाथ मुंडे यांनी मला मुलगा मानलेले आहे. पंकजा मुंडे ह्या माझी बहीण आहेत. जेव्हा माझ्या पक्षाला तुम्ही 145 आमदार द्याल, तेव्हा मी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करेन,’ असे जानकर यांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडे या भाजपच्या मास लीडर म्हणून ओळखल्या जातात. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा परळीमधून पराभव झाला आहे. त्या पराभवाला अनेक गोष्टी कारणीभूत असल्याची चर्चा होत असते. त्यात जवळच्या लोकांनीच पंकजा मुंडे यांना पराभूत करण्यासाठी हातभार लावल्याचा एक सूरही राजकीय वर्तुळातून उमटत असतो. त्याला पंकजा मुंडे यांचे 2014 मधील विधान कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

मोदी लाटेत 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष केंद्राबरोबरच राज्यातही सत्तेत आला होता. त्या निवडणुकीत पंकजा मुंडे या परळीतून विधानसभेला निवडून आल्या होत्या. त्यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेशही झाला होता. मात्र, एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी ’आपणच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत,’ असे विधान केले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात विशेषतः भारतीय जनता पक्षात एक लाट निर्माण झाली होती. खरं त्या विधानातून सर्वसामान्य राजकारण्यांना वाटतं तसं पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील सुप्त इच्छा व्यक्त केली होती.

पंकजा यांच्या त्या विधानानंतर काही ‘सेफ राजकीय खेळ्या’ खेळल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात तेव्हाही झाली होती आणि आताही होत असते. त्यानंतर त्यांच्यावर चिक्की घोट्याळाचा आरोप झाला. पुढच्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या, पण आता महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याचे विधान केल्याने जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला आहे.

महादेव जानकर यांनी केलेल्या विधानावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीशी अशी काही नाती निर्माण झालेली असतात, त्यातून जगातील सर्वोत्कृष्ट जे आहे, ते आपल्या माणसाला मिळावं, असं वाटणं हा मानवाचा स्वभाव आहे. नेता कितीही मोठा झाला तरी तो शेवटी माणूसच असतो, त्यामुळे जानकर यांना तसं वाटणं स्वाभाविकच आहे. आम्ही पक्षाचे नेतृत्व जे ठरवेल त्याप्रमाणेच वागत असतो.

गोपीनाथ मुंडे यांनी महादेव जानकर यांना भारतीय जनता पक्षाबरोबर आणलं. त्यांनी आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे वेगळे अस्तित्व ठेवले. पार्टीशी त्यांचा संबंध गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आला. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांची खूप अटॅचमेंट आहे. जानकर यांचं विधान चुकीचं नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीमध्ये बहुमताएवढी फिगर जमली की आपल्याला पाहिजे तसं करता येतं. पंकजा मुंडे या हसल्या किंवा शिंकल्या तरी बातमी होते. त्यांच्या बोलण्याचा अर्थ तुम्ही चुकीचा काढल्यामुळे त्यांचं खूप नुकसान होतं आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT