sharad pawar bjp sarkarnama
विश्लेषण

Lok sabha Election 2024 : ठरलं, बारामतीनंतर सर्वाधिक चर्चेची ठरणार 'ही' निवडणूक!

Raver Lok Sabha Constituency : रावेर मतदारसंघातील विविध संस्थांवर भाजपचा ताबा असला, तरी...

Sampat Devgire

Khadse Vs Mahajan News : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. जळगाव शिवसेनेला तर रावेर मतदारसंघ शरद पवार गटाला सोडण्यात येणार आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे रावेर मतदारसंघात सून रक्षा खडसे विरुद्ध सासरे एकनाथ खडसे अशी लढाई होते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातून ( Raver Loksabha Constituency ) एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) स्वत: लढणार आहेत. याबाबत खडसेंनी शुक्रवारी ( 16 फेब्रुवारी ) दुजोरा दिला आहे. खडसेंच्या उमेदवारीनं भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर भाजपकडून प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. खडसेंच्या घोषणेनं रावेर मतदारसंघातून भाजप आणि खडसेंतील राजकीय वर्चस्ववादाचा लढा अधिक टोकाला जाऊ शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रावेर लोकसभा मतदारसंघात लेवा पाटील समाजाचा प्रभाव आहे. त्यामुळे विविध संस्थांवर भाजपचा ताबा असला तरीही सामाजिकदृष्ट्या स्वतः खडसे मैदानात उतरल्यास येथील चित्र बदलू शकते. मतदारसंघातील कार्यकर्ते आणि विविध घटकांवर खडसेंचा प्रभाव तसेच व्यक्तीशः संपर्क आहे. याच मतदारसंघात भाजपचे नेते आणि खडसेंचे कट्टर विरोधक गिरीश महाजन यांचे कार्यक्षेत्रदेखील आहे. या दोन्ही नेत्यांतून विस्तवही जात नाही. त्यामुळे लोकसभेची निवडणूक अधिक रंगतदार होण्याचे संकेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जळगाव येथे घेतलेल्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी खडसेंनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे, असं संकेत दिले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीसुद्धा खडसेंना उमेदवारीसाठी गळ घातली होती. या पार्श्वभूमीवर रक्षा खडसेंच्या उमेदवारीचा फेरविचार होऊ शकतो, असं विधान गिरीश महाजनांनी केलं होतं. त्यामुळे आता भाजप रक्षा खडसेंना उमेदवारी देणार का? की मतदारसंघात खडसे विरुद्ध अशी लढत पाहायला मिळणार? हा प्रश्न येत्या महिनाभरात निकाली निघणार आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात जळगावची जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी जळगावचा दौरा केला आहे. या वेळी त्यांनी पक्षाकडे पाच इच्छुक उमेदवार असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेला उमेदवारीसाठी चाचणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने उमेदवार निश्चित करण्यात आघाडी घेतली आहे.

जळगाव जिल्ह्यातील राजकारणात भाजपचे वर्चस्व आहे. त्यात एकनाथ खडसेंचही योगदान होतं. खडसेंनी पक्षांतर्गत राजकीय कुरघोडीच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभेला खडसेंच्या पराभवासाठी गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील हे तीन मंत्री पूर्ण ताकद लावतील. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरू शकते. अशा स्थितीत बारामतीनंतर बहुचर्चित निवडणूक कोणती या प्रश्नाचे उत्तर 'रावेर लोकसभा मतदारसंघ', असे स्पष्ट झाले आहे.


( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT