Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Thackeray brothers strategy : ठाकरे बंधूंची चाल एकनाथ शिंदेंवर भारी पडणार? मराठी मतदार खेचण्यासाठी काढले ‘मास्टर कार्ड’

Eknath Shinde political rivalry News : उद्धव ठाकरे यांची शिवसेना या निवडणुकीत मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठे कार्ड खेळत आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षात वेगवान घडामोडी घडत आहेत. गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून इच्छुक असलेले नेतेमंडळी तयारीला लागले आहेत. विशेषतः मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप, शिंदे सेना, ठाकरेंची शिवसेना, मनसे व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजपकडूनच शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी केली आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत शिंदे यांच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना या निवडणुकीत मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठे कार्ड खेळत आहे. त्यानुसार ठाकरे यांच्या शिवसेनेतून पाळवलेल्या माजी नगरसेवकांच्या विरोधात आता मनसेचे उमेदवार रिंगणात उतरवले जाणार असल्याने ठाकरे बंधूंची ही चाल शिंदे सेनेवर भारी पडणार आहे.

जून 2022 मध्ये शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार व 13 खासदारसोबत नेले होते. त्यावेळी मॅब महापालिकेतील नगरसेवक काही त्यांच्या गळाला लागले नव्हते. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी महायंतीची वाट धरली आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेचे १०० माजी नगरसेवक होते त्यामधील 40 पेक्षा अधिक नगरसेवक मधल्या काळात एकनाथ शिंदे यांच्या गळाला लावले आहेत. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेतील निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून मुंबईत दोन सेना कायम आमने-सामने उभ्या ठाकल्या आहेत. पण या वर्षी मे महिन्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने पारडे पालटले आहे. त्यातच महायुतीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्याचाच फायदा घेण्याची तयारी सध्या सुरू आहे. मुंबई महापालिकेसाठी आतापर्यत मनसे कडून 75 जागांची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. मनसेने मागणी केलेल्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे उद्धव सेनेचा हा मनसे डाव शिंदे सेनेच्या अंगलट येणार आहे.

महापालिका निवडणुकीत मनसे शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणार असल्याचे समजते. या निवडणुकीत शिंदे सेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यात येणाऱ्या जागा त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे मनसेला सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रभागात जोरदार लढतीची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसापासून मनसेने जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे शिंदे सेना येत्या काळात बॅकफुटला जाणार आहे.

बीएमसी निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेच्या या खेळीचा मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. एक म्हणजे शिंदेच्या उमेदवारांना मनसेने रोखायचे आणि दुसरे म्हणजे भाजपला उद्धव ठाकरे गटाने रोखायचे अशी रणनीती ठाकरे बंधूनी आखली आहे. ही रणनीती जर येत्या काळात यशस्वी झाली तर त्याचा फायदा मनसे-उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युतीला होणार आहे.

ज्याठिकाणी शिंदेचे उमेदवार आहेत, त्याठिकाणी उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला तर शिवसैनिकांची पसंती शिंदेंच्या उमेदवाराला असू शकते. पण शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मनसेने उमेदवार दिला तर आपसूकच शिंदेंचे शिवसैनिकही मनसेला पर्याय म्हणून मतदान देऊ शकतात. तर, ठाकरेंनी भाजपच्या विरोधात उमेदवार दिला तर मनसेचे आणि शिंदे गटाची मतेही ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही रणनीती यशस्वी करण्यासाठी दोन्ही सेनेचे प्रयत्न सुरु आहेत.

महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलेच बिनसले आहे. त्यामुळे हे प्रकरण थेट दिल्लीपर्यंत गेले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या नाराज शिवसैनिकांची मते ठाकरेंना मिळू शकतात. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्तेचा राजमार्ग खुला होण्याची शक्यता ठाकरे बंधूना होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ठाकरे बंधूनी त्यांची रणनीती बदलली आहे. या बदलेल्या रणनीतीला येत्या काळात कसा प्रतिसाद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT