CM Fadnavis Ajit Pawar Sunil Tatkare Eknath Shinde Bharat Gogawale Sarkarnama
विश्लेषण

Bharat Gogawale-Aditi Tatkare: गोगावलेंना कुणी गंडवले? तटकरे-अमित शाह भेट सार्थकी लागली का?

Tatkare, Amit Shah meeting News : महाराष्ट्र दिनी रायगडच्या ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळात रायगडचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच राहणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच शिवसेनेत मात्र यावरून नाराजी दिसत आहे.

सरकारनामा ब्युरो

Raigad News : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येऊन पाच महिन्याचा कालावधी झाला आहे. त्यानंतर ही महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रवीअसलेला छुपा संघर्ष पाहवयास मिळत आहे. सरकार स्थापन झाल्यापासून तीन पक्षात मंत्रिपद, खातेवाटप, पालकमंत्रिपद व बंगले वाटपावरून नाराजी आहे. विशेषतः गेल्या चार महिन्यापूर्वीच रायगड व नाशिकच्या पालकमंत्रिपदाचे वाटप करण्यात आले होते. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीनाट्यामुळे दोन दिवसातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडीला स्थगिती दिली होती.

त्यावेळेसपासून हा तिढा कायम आहे. त्यातच आता महाराष्ट्र दिनी रायगडच्या ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळात रायगडचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच राहणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच शिवसेनेत मात्र यावरून नाराजी दिसत आहे.

रायगड जिल्ह्यात स्थानिक राजकारण फारच गुंतागुंतीचे आहे. येथे शिवसेना (ठाकरे गट), शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप (BJP) यांच्या स्थानिक वर्चस्व टिकवण्यासाठी मोठी रस्सीखेच आहे. पालकमंत्रिपद हे फक्त एक पद नसून, ते जिल्ह्यातील विकासाच्या निधीवर, प्रशासकीय निर्णयांवर प्रभाव टाकणारे आहे. त्यामुळे कोणताही पक्ष किंवा गट सहजासहजी हे पद दुसऱ्याला देण्यास तयार नाही. त्यामुळेच या वादामागे केवळ सत्तासमीकरणांचा विषय नाही, तर काही सखोल राजकीय आणि सामाजिक कारणंही दडलेली आहेत. त्यामुळेच येथील पालकमंत्री पदाच्या वादातून शिंदेंची शिवसेना अथवा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस माघार घेण्यास तयार नाही. त्यामुळेच हा तिढा गेल्या चार महिन्यापासून सुटत नाही.

गोगावलेंना कुणी गंडवले?

शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) रायगडचे पालकमंत्री होणार याची चर्चा मंत्रिमंडळ विस्तारानंतर जोरात होती. रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार असल्याने शिवसेनेची दावेदारी मोठी होती. त्या उलट भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक-एक आमदार जिलह्यात असल्याने शिवसेनेला मोठी संधी होती. मात्र, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र दावा कायम ठेवला आहे. गेल्या महायुती सरकारच्या काळात अजित पवार महायुतीसोबत सत्तेत आल्यानांतर वर्षभर अदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री होत्या. त्यामुळे यावेळेस त्यांनी दावा कायम ठेवला होता.

त्यातच 15 दिवसापूर्वी रायगडावरील एका कार्यक्रमामुळे केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी स्नेहभोजनच्या निमित्ताने अमित शाह यांनी तटकरे यांच्या रायगडमधील निवासस्थानी गेले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र, यावेळी भोजनाच्या निमित्ताने या नेतेमंडळीत काय चर्चा झाली? हे पुढे आले नाही. मात्र, यावेळेस तटकरे यांच्या निवासस्थानी मंत्री भरत गोगावले यांनी जाणे टाळले होते. यावेळेस पालकमंत्री पदावरून चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

अजित पवार-तटकरे यांना फडणवीस यांचाही पाठिंबा आहे का?

दुसरीकडे हा पालकमंत्री पदाचा वाद न सोडवता शिंदे व अजितदादा यांच्यातील वादाला भाजपकडून खतपाणी घातले जात असल्याचे शिंदे गटाच्या नेत्याकडून सांगितले जात आहे. दरम्यान, फडणवीस व अजितदादांकडून नेहमीच शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, त्यावर अमित शाह यांच्याकडुन काही तोडगा काढला जाणार का? याची उत्सुकता सर्वाना लागली होती. मात्र, या डिनर डिप्लोमसीनंतरही वादावर पडदा पडला नाही.

अमित शाह यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावेळी पुण्यातील मुक्कामी एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा एकत्र बैठकीला होते. त्यानंतर मुंबईत शिंदे दोनवेळा एकटेच अमित शाह यांना भेटले. तर दुसरीकडे रायगड व नाशिकमधील पालकमंत्री पदाचा वाद सुरु असताना अजितदादांनी शाह यांना सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी घेऊन गेले. या स्नेहभोजनावरून वेगळीच चर्चा रंगली असून रायगडमध्ये भाजपने भरत गोगावले यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याने शिंदे बॅकफुटावर गेले असल्याची चर्चा आहे.

अदिती तटकरेंना पालकमंत्रीपदाचा मान मिळू शकतो?

महाराष्ट्र दिनी आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे. तसाच येत्या काळात पालकमंत्रीपदाचा मानही त्यांना मिळू शकतो का? याची सध्या जुर्रत चर्चा रंगली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसग्मध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे शिवसेनेत नाराजी दिसत आहे. कारण ध्वजवंदनाचा मान हा पालकमंत्र्यांचा असतो. मागच्या वेळी आदिती तटकरे मंत्री असूनही त्यांना पालघरला पाठवण्यात आले होते. रायगड येथे वादामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजवंदन केले होते, मग यावेळी कसा काय मान मिळाला? याची चर्चा जोरात सुरु आहे.

तटकरे-अमित शाह भेट सार्थकी लागली का?

महायुती सरकारमध्ये सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे नाराज आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे असे समीकरण जाणवत आहे. ते समीकरण सत्तास्थापन होऊन चार महिने झाले तरी प्रकर्षाने जाणवत आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी हे सूक्ष्म पण लक्षवेधी राजकीय समीकरण स्पष्टपणे जाणवत होते.

केंद्रीय मंत्री अमित शाह हे सुनील तटकरे यांच्या घरी जेवणासाठी जातात त्याला राजकीयदृष्टया खूप महत्त्व आहे. यावेळी डिनर डिप्लोमसीतून नेमकी काय चर्चा झाली हे पुढे आले नसले तरी नक्कीच यावेळी अनेक अनौपचारिक चर्चा झाली असणार मात्र, या चर्चेतून नेमके काय ठरले, हे समजण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळेच सध्या तटकरे-अमित शाह यांची ही भेट सार्थकी लागली असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT