Dharashiv News : कर्नाटकमधील उत्तर कन्नडा लोकसभा मतदारसंघातून थेट दिल्ली गाठण्यासाठी उमरग्याची (जि. धाराशिव) उच्चशिक्षित कन्या सज्ज झाली आहे. खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना काँग्रेसने या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. डॉ. अंजलीताई या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निकटच्या नातेवाईक आहेत.
अंजलीताई निंबाळकर यांचे 12 वीचे शिक्षण उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून झाले. नंतर त्यांनी मुंबई येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. दिवंगत डॉ. रमेश पाटील यांच्या त्या कन्या. डॉ. पाटील हे मुंबई येथील जेजे हॉस्पिटलचे अधीक्षक होते. ईएसआयएस हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
1986 ते 1988 दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे ओएसडी (आॅफिसर आॅन स्पेशल ड्यूटी) म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. दानशूर अशी त्यांची ओळख होती. डॉ. पाटील यांचे उमरग्याच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठे वजन होते. उमरगा पंचक्रोशीत आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंजलीताई यांचा विवाह कोल्हापूरचे रहिवासी असलेले आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्याशी झाला.
त्यावेळी निंबाळकर हे सीमेलगतच्या कर्नाटकमधील बेळगावीचे (पूर्वीचे बेळगाव) पोलिस अधीक्षक होते. निंबाळकर हे आता कर्नाटकचे पोलिस महासंचालक आहेत. अंजलीताई यांना सामाजिक कार्याची आवड होती. खानापूर मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
मराठीसह कन्नड आणि इंग्रजी भाषेवरही अंजलीताई यांचे प्रभुत्व आहे. ही बाब त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली. 2013 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. 2018 च्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. 2023 मध्ये त्यांचा पराभव झाला. आता काँग्रेसने त्यांना उत्तर कन्नडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि उमरगा येथील भारत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती दिवंगत श्रीधरराव मोरे यांच्यात साडूभाऊचे नाते होते. भारत शिक्षण संस्था ही मराठवाड्यातील सर्वात जुन्या शिक्षण संस्थांपैकी एक आहे. डॉ. रमेश पाटील हे श्रीधरराव मोरे यांचे जावई होते. अंजलीताई या श्रीधरराव मोरे यांच्या नात आहेत. या अर्थाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे अंजलीताई यांचे मामा आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अंजलीताई यांनी खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्यावेळी अशोक चव्हाण यांनी तेथे जाऊन त्यांचा प्रचार केला होता. मात्र, आता अशोक चव्हाण हे भाजपवासी झाले आहेत. असे असले तरी अंजलीताई यांनी पक्ष बदललेला नाही. अंजलीताई यांना उमेदवारी मिळालेल्या उत्तर कन्नडा लोकसभा मतदारसंघातील उत्तर कन्नड व बेळगाव जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी पाच मतदारसंघांत काँग्रेसचे तर दोन मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. त्या विजयी झाल्या तर उमरगेकरांना लेकीचा अभिमान वाटणार आहे.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.