Patangrao Kadam : टपाली मतांनी झाला होता लोकनेत्याचा पराभव

Patangrao Kadam Sarkarnama Podcast : पतंगराव कदम हे 1980 च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते.
Patangrao Kadam
Patangrao KadamSarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Podcast: ध्येय निश्चित करून त्यांच्या पूर्तीसाठी झपाटल्यासारखं काम करणारे अनेक नेते महाराष्ट्राने पाहिले आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पतंगराव कदम हे अशा नेत्यांपैकीच एक. भारती विद्यापीठाची स्थापना आणि विविध विद्याशाखांचा विस्तार करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात घट्ट पाय रोवलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसह अनेकांच्या रोजगाराचा प्रश्नही पतंगरावांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून मिटवला. राजकारणातही घट्ट पाय रोवून उभ्या राहिलेल्या पतंगराव कदम यांचा विधानसभेच्या एका निवडणुकीत पराभव झाला होता, तोही पोस्टल मतांमुळे केवळ 86 मतांनी पतंगराव त्या निवडणुकीत पराभूत झाले होते.

काही दिग्गज राजकीय नेत्यांनाही त्यांच्या कारकि‍र्दीत पराभव पत्करावे लागले आहेत. निवडणुकीतील पराभवाचा विचार केला तर अलीकडच्या काळातील पहिलं नाव डोळ्यांसमोर येतं ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं. तो पराभव त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा अंत ठरला नाहीत, तर त्यांची राजकीय कारकीर्द त्यानंतरच खऱ्या अर्थाने फुलायला सुरुवात झाली. 1995 च्या पराभवानंतर विलासराव देशमुख दोनवेळा मुख्यमंत्री बनले. या यादीत दुसरे नाव येते ते माजीमंत्री पतंगराव कदम यांचे. पतंगरावांचा 1980 मध्ये हा पराभव पोस्टल मतांमुळे झाला होता. पराभवानंतर त्यांचीही राजकीय कारकीर्द फुलली, मात्र ते मुख्यमंत्रि‍पदाला गवसणी घालू शकले नाहीत.

पतंगराव कदम हे काँग्रेसच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील सोनसळ येथे 8 जानेवारी 1944 रोजी झाला. बिकट आर्थिक परिस्थिती असलेल्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून पतंगरावांनी राज्यातच नव्हे तर देशभरात शिक्षणसंस्थांचं जाळं निर्माण केलं आहे. कोणत्याही प्रकारचा असा वारसा नसताना, आधार नसताना पतंगराव कदम यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेली ही कामगिरीही डोळे दीपवून टाकणारी आहे. राजकीय क्षेत्रासह शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही पतंगराव कदम यांचा नावलौकिक आहे.

सोनसळ या पतंगरावांच्या जन्मगावी चौथीपर्यंतची एकशिक्षकी शाळा होती. पुढील शिक्षणासाठी त्यांना शेजारच्या शिरसगावाच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला. यासाठी त्यांना दररोज 4 ते 5 किलोमीटर पायपीट करावी लागत असे. कुंडल येथील एका निवासी शाळेतून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. यादरम्यान ते क्रांतीसिंह नाना पाटील बोर्डिंगमध्ये राहिले.

मॅट्रिक पास होणारे पंतगराव कदम हे त्यांच्या सोनसळ गावातील पहिलेच विद्यार्थी होते. याचा उल्लेख ते आपल्या भाषणांमध्ये नेहमी करायचे. पंतगराव कदम यांचे वडील श्रीपतराव कदम हे शेतकरी होते. त्या काळातही त्यांना शिक्षणाचं महत्व कळलेलं होतं. आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं आणि देश, समाजाची सेवा करावी, असं त्यांना वाटत असे. त्यामुळे श्रीपतराव कदम यांनी आपल्या सर्व अपत्यांच्या शिक्षणाची काळजी घेतली होती.

Patangrao Kadam
Eknath Shinde : मुख्यमंत्री रामटेकमध्ये आले पण दक्षिण नागपूरकडे फिरवली पाठ? काय आहे कारण?

मॅट्रिक झाल्यानंतर पतंगराव यांनी शिक्षणासाठी सातारा गाठलं. तेथे त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. कमवा आणि शिका योजनेत भाग घेतला. याद्वारे त्यांनी स्वतःच्या शिक्षणाचा खर्च त्यांना स्वतः काम करून भागवला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या या शिक्षणसंस्थेतून त्यांना सामाजिक कार्याचे धडे मिळाले. महाविद्यालयीन जीवनातच त्यांच्या सामाजिक जाणि‍वा प्रगल्भ झाल्या.

पतंगराव कदम हे 1961 मध्ये पुण्यात आले. तेथे त्यांनी एक वर्षाचा पदविका अभ्यास पूर्ण करून रयत शिक्षण संस्थेच्या एका माध्यमिक शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून काम सुरू केलं. त्यासोबतच त्यांनी पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली. '1980 च्या दशकातील शैक्षणिक प्रशासनातील प्रशासकीय समस्या' या विषयावर त्यांनी शोधप्रबंध साधर केला. त्यासाठी त्यांना पुणे विद्यापीठाची पीएच.डी. मिळाली. नंतर त्यांनी दुध संस्था, सूतगिरणी, साखर कारखाने, बँकेचीही उभारणी केली.

दाहीदिशांना चर्चा हईल, अशी एक शिक्षणसंस्था मला सुरू करायची, आहे असं अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करत असताना पतंगराव म्हणत असते. केवळ अशक्य असं वाटणाऱ्या या स्वप्नाची पूर्ती पतंगरावांना नंतर केली, ती त्यांच्यातील अफाट क्षमतेमुळे. पतंगरावांचा स्वभाव रांगडा होता, काम करण्याची शैली बिनधास्त होती, मन निर्मळ होते.

Patangrao Kadam
PM Narendra Modi : मोदी महायुतीच्या सत्तेसाठी आक्रमक; काँग्रेस, नेहरू, गांधी परिवाराच्या जातीच्या राजकारणावर घणाघात

निवडणूक जिंकणं आणि कोणतं तरी मोठं पद मिळवणं, अशी आजच्या राजकारणातील यशाची व्याख्या रूढ झाली आहे. काही वर्षांपूर्वीपासून अशी व्याख्या केली जाऊ लागली आहे. थोडसं मागं वळून पाहिले तर ही व्याख्या राजकीय नेत्यांसाठी गौण होती. समाजासाठी रचनात्मक कामं करणं, शाश्वत विकासाची कामं करणं, असं ध्येय उराशी बाळगून नेते राजकारणात प्रवेश करत असत. अशा नेत्यांची लांबलचक यादी तयार होऊ शकते. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या आणि नंतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची पताका फडकवणार्‍या पतंगराव कदम यांचा या यादीत नक्कीच समावेश होतो.

पश्चिम महाराष्ट्राचे लोकनेते अशी पतंगराव कदम यांची ओळख होती. ते 40 पेक्षा अधिक वर्षे राजकारणात सक्रिय होते. सांगली जिल्ह्यात त्या काळात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भक्कम होती. सांगली जिल्ह्यातच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही वसंतदादांचा दबदबा होता. अशा काळात पतंगराव कदम यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांच्या नेतृत्वानं सर्वांनाच भुरळ घातली होती. 1980 ची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती.

पतंगराव कदम यांचा1980 च्या निवडणुकीत अवघ्या 86 पोस्टल मतांनी पराभव झाला होता. विलासरावांच्या पराभवाचा जितका गवगवा झाला तितका पतंगरावांच्या पराभावाचा झाला नव्हता. सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव हा पतंगरावांचा मतदारसंघ. या मतदारसंघाचं नाव 2009 च्या आधी भिलवडी वांगी असं होतं. 1985 ते 1995 पर्यंत पतंगराव या मतदारसंघातून विजयी झाले. संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीचा अपवाद सोडला तर पुढे 2014 पर्यंत या मतदार संघातून पतंगराव विजयी झाले होते. पतंगराव कदम हे विधानसभेच्या निवडणुकीत सहावेळा विजयी झाले होते. 1980 ला मात्र पोस्टल मतांमुळे त्यांचा पराभव झाला होता.

संपतराव चव्हाण हे 1978 मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर पहिल्यांदा आमदार झाले होते. 1980 च्या निवडणुकीत मतदारांमध्ये त्यांच्याबाबत प्रचंड नाराजी होती, असं सांगितलं जातं. या निवडणुकीत चव्हाण यांच्यासमोर पतंगराव कदम यांनी आव्हान उभं केलं होतं. पतंगराव अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. काम करण्याची धडाकेबाज शैली आणि रांगड्या स्वभावामुळे ते लोकप्रिय झाले होते. त्यामुळे चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नव्हती. चव्हाण यांच्याविरोधात लोकांना पतंगरावांच्या रूपाने सक्षम पर्याय उपलब्ध झालेला होता. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.

चव्हाण यांनी 1978 च्या निवडणुकीत कुंडल येथील जी. डी. बापू लाड यांचा पराभव केला होता. त्यामुळे आणि नव्या उमेदवाराला ताकद देण्याच्या हेतूने जी. डी. बापू यांनी पतंगरावांना पाठिंबा दिला हता. सर्व शक्ती पतंगरावांच्या पाठीमागे उभी केली होती. त्यावेळी काँग्रेसला पर्याय नव्हता. काँग्रेस पक्ष तळागाळात रुजलेला होता. त्यामुळे निवडणूक अटीतटीची झाली. असं असलं तरी पतंगरावांचा विजय होणार, याबाबत कार्यकर्त्यांना शंका नव्हती.

निवडणूक जास्तच अटीतटीची झाली. सर्व फेऱ्यांमध्ये दोन्ही उमेदवार बरोबरीनं चालत होते. शेवटच्या फेरीतही दोघांना बरोबरीनंच मतदान झालं. पतंगराव केवळ काही मतांनी पुढं होते. टपालाद्वारे आलेल्या मतांची मोजणी शिल्लक होती. सगळ्या पेट्यांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर टपाली मतांची मोजणी सुरू झाली. टपालाद्वारे आलेली बहुतांश मतं चव्हाण यांच्या पारड्यात पडली. त्यामुळं पतंगराव कदम यांचा अवघ्या 86 मतांनी पराभव झाला. टपाली मतांची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांची यंत्रणा त्या मतदारांपर्यंत पोहोचलेली नव्हती.

Patangrao Kadam
PM Narendra Modi: काँग्रेसच्या कार्यकाळात देशात दोन संविधान; जम्मू-काश्मीरमधील 'कलम 370'च्या ठरावावरून PM मोदींचा संताप

या निवडणुकीत समाजवादी काँग्रेसचे शाहीर शंकरराव निकम हेही उमेदवार होते. निकम यांनी प्रतिसरकार चळवळीच प्रचारमंत्री म्हणून कामगिरी बजावली होती. या मतदारसंघातील घाटावरच्या भागात पतंगराव लोकप्रिय होते आणि त्याच भागातील अधिक मतं निकम यांना मिळाली होती, असं सांगितलं जातं. निकम यांना या निवडणुकीत 4836 मतं मिळाली होती. निकम उमेदवार नसते तर पतंगराव 1980 मध्येच आमदार झाले असते.

हा पराभव पतंगरावांच्या राजकीय कारकि‍र्दीला ब्रेक लावू शकला नाही, उलट त्यानंतर त्यांची कारकीर्द फुलत गेली. 1990 मध्ये त्यांना राज्याचं शिक्षणमंत्रीपद मिळालं. सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे स्थान पक्के राहिले. त्यांनी महत्वाची खाती सांभाळली. विकासाच्या दृष्टीने दूरगामी परिणाम करणारे निर्णय त्यांनी घेतले. मुख्यमंत्रिपदाची त्यांची इच्छा लपून राहिलेली नव्हती, मात्र मुख्यमंत्रिपदानं त्यांना सतत हुलकावणीच दिली.

Patangrao Kadam
Aziz Basha and Government of India Case : 'AMU'बाबत 1967चे अजीज बाशा विरुद्ध भारत सरकार प्रकरण नेमके काय आहे?

पतंगराव हे अखेरपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. असं सांगितलं जातं, की प्रत्येकवेळी ज्येष्ठ नेते म्हणून मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव चर्चेत यायचं. त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते, मात्र त्यांचा गट नव्हता. त्यांनी कधीही लॉबिंग केलं नाही. पक्षश्रेष्ठींवर त्यांचा मोठा विश्वास होता, त्यामुळे आपल्याला संधी मिळेल, असे त्यांना वाटत असे.

पतंगराव स्पष्टवक्ते होते, दिलदार होते. एखादे काम घेऊन त्यांच्याकडे कुणी गेले तर त्याला ते शक्य तितकी मदत करायचे. भारती विद्यापीठाचा वटवृक्ष झालेला आज आपल्याला दिसून येतो. त्याची सुरुवात पुण्याच्या सदाशिव पेठेतील एका दहा बाय दहाच्या खोलीत केली होती, असं पतंगराव सांगत असत. अशा या लोकनेत्याचं 9 मार्च 2018 रोजी मुंबई येथे निधन झालं..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com