

Cockroach Janata Party protest : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू केलेल्या आंदोलनाचा मंगळवारी २३ वा दिवस पूर्ण झाले. तर सोनम वांगचूक यांच्या उपोषणालाही १७ दिवस झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी देशातील प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक पक्षांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. पण काँग्रेस अद्याप एकदाही या आंदोलनावर जाहीर भाष्य न केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
कॉक्रोच जनता पार्टीकडून येत्या २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर पार्टीकडून राजकीय पक्षांचाही आंदोलनाला पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टीकडून सत्ताधारी भाजपसह काँग्रेस व इतर राजकीय पक्षांच्या २० नेत्यांशी संपर्क करून त्यांना आपल्या मागण्यांविषयी माहिती दिली आहे.
नेत्यांना ९ व १० जुलैला पत्र पाठवून जंतरमंतरवर येऊन पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नेत्यांची यादीच सोशल मीडियात पोस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तर दुसऱ्या क्रमांकावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव आहे.
काँग्रेसकडून 'छात्रों की गूंज' या स्वतंत्र चळवळीच्या माध्यमातून देशभरात देशातील शैक्षणिक व्यवस्था आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रान उठविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता कॉक्रोच पार्टीकडून थेट पत्र पाठविण्यात आल्याने राहुल गांधी यांची कोंडी झाली आहे. इंडिया आघाडीतील समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, द्रमुक, डावे पक्ष, आम आदमी पक्ष या पक्षांतील नेते, अनेक संघटना, विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
दुसरीकडे पेपरफुटी, विद्यार्थी आत्महत्येवरून सरकारला घेरणाऱ्या राहुल गांधी यांनी या आंदोलनावर चकार शब्दही काढलेला नाही. त्यावरून सोशल मीडियातही आता काँग्रेस व राहुल गांधीवर टीका होऊ लागली आहे. आता दीपके यांनी स्वत:हून संपर्क केल्याने राहुल यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागण्याचा दबाव वाढणार आहे. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
यादीत महाराष्ट्रातील एक अन् भाजपमधील दोन नावे
कॉक्रोच जनता पार्टीकडून २० राजकीय नेत्यांना पत्र पाठवून पाठिंबा मागण्यात आला आहे. विशेष म्हणजे या यादीत भाजपमधील दोन नावे आहेत. एक म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि दुसरे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा. भाजप नेत्यांनाही पत्र पाठविण्यात आल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील केवळ एकच नाव आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या नावाचा समावेश आहे. दीपके यांनी ठाकरेंशी थेट बोलणेही झाले आहे. ठाकरेंनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.