नवी दिल्ली : देशात कोरोनाने (Covid-19) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट सुरू होती. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. यामुळे दिल्लीत (Delhi) पुन्हा मास्क (Mask) सक्ती करण्यात आली आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर मास्क न घालणाऱ्यांसाठी पाचशे रुपयांचा दंड पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. (Covid-19 News Updates)
पुन्हा एकदा जगावर कोरोनाचे संकट घोंघावू लागले असून, ही कोरोनाची चौथी लाट (Fourth Wave) असल्याचा धोका व्यक्त होत आहे. दिल्लीत तीन आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याने दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मास्कची सक्ती मागे घेतली होती. त्याचवेळी मास्क न घालणाऱ्यांसाठी पाचशे रुपयांचा दंडही मागे घेण्यात आला आहे. आता दिल्लीत पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. काल दिल्लीत 632 कोरोना रुग्ण आढळले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या पाचशेपेक्षा अधिक आहे. यामुळे प्राधिकरणाची तातडीची बैठक आज झाली.
प्राधिकरणानं या बैठकीत पुन्हा मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मास्क न घालणाऱ्यांसाठी पाचशे रुपये दंड पुन्हा सुरू करण्याचेही सूतोवाच केले आहे. शाळा सुरूच राहणार असून, त्यांच्यासाठीची नियमावली तज्ञांशी चर्चा करून ठरवण्यात येणार आहे. तसेच, कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत रुग्णसंख्या वाढली असली तरी पॉझिटिव्हीटी दर 7.72 टक्क्यांवरून 4.42 टक्क्यांवर घसरला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत कोरोनाचे 2 हजार 67 रुग्ण आढळले आहेत. त्याआधीच्या 24 तासांत ही रुग्णसंख्या 1 हजार 347 होती. याचबरोबर पॉझिटिव्हीटी दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. तो 0.49 टक्क्यावर पोचला आहे. मागील 24 तासांत 1 हजार 547 कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत. याचवेळी मागील 24 तासांत 40 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.