Air India pilot drug test : एअर इंडियाच्या विमानातील थरारक घटनेप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. थायलंडमधील फुकेतहून दिल्लीच्या दिशेने येताना ४ ऑगस्ट रोजी एअर इंडियाचे विमान अचानक तब्बल ३०० फूट खाली आले होते. या घटनेनंतर विमानाच्या कॅप्टनची अंमली पदार्थ (डोप टेस्ट) चाचणी करण्यात होती. या चाचणीत कॅप्टन दोषी आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मात्र, एअर इंडियाने या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "लागू नियमांनुसार वैमानिकांची उड्डाणानंतरची चाचणी घेण्यात आली होती. मात्र, चाचणीचे निकाल अद्याप कंपनीसोबत शेअर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे याबाबत सध्या कोणतेही भाष्य करता येणार नाही."
नेमकं विमानात काय घडलं?
४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ८.२५ वाजता फुकेतहून एअर इंडियाचे एअरबस A320 विमान दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. विमानात १४५ प्रवासी होते. नियोजित वेळेनुसार सकाळी ११.०७ वाजता विमान दिल्ली विमानतळावर पोहोचणे अपेक्षित होते. दिल्लीच्या दिशेने प्रवास करत असताना विमानाला अचानक तीव्र टर्बुलेंसचा सामना करावा लागला. हवेचा वेग, दाब किंवा दिशेत अचानक झालेल्या बदलामुळे विमान जोरदारपणे हलू लागले. त्याचवेळी विमान काही क्षणांतच सुमारे ३०० फूट खाली आले.
विमान अचानक खाली आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. विमानाला बसलेल्या जोरदार धक्क्यामुळे काही प्रवासी आणि क्रू मेंबर्स विमानाच्या छताला आदळले. काही प्रवासी जखमी झाले. विमानात काही काळ आरडाओरड आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वैमानिकांनी परिस्थिती नियंत्रणात आणत विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. या घटनेत जखमी झालेल्या १३ प्रवाशांसह चार क्रू मेंबर्सना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
DGCAकडून चौकशी सुरू
या घटनेची गंभीर दखल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संबंधित वैमानिकांना तूर्तास उड्डाणाच्या ड्युटीपासून दूर ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कॅप्टनच्या डोप टेस्टबाबत समोर आलेल्या माहितीनंतर या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.
डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्यास काय होऊ शकते?
DGCAच्या नियमांनुसार वैमानिक डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्यास त्याच्यावर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाऊ शकते. पहिल्यांदा दोषी आढळल्यास वैमानिकाला व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी पाठवले जाऊ शकते. दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास त्याचा परवाना तीन वर्षांपर्यंत निलंबित होऊ शकतो. तर तिसऱ्यांदा दोषी आढळल्यास वैमानिकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.