नवी दिल्ली : पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर त्रिपुरात भाजपला (BJP) खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या दोन आमदारांनी सोमवारी आमदारकीसह पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला. ते दिल्लीत जाऊन काँग्रेस (Congress) किंवा तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होऊ शकतात. त्यांच्यासोबत अन्य काही आमदारही लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचा जोरदार चर्चा सुरू आहे.
त्रिपुराचे (Tripura) माजी आरोग्य मंत्री सुदिप रॉय बर्मन (Sudip Roy Barman) आणि आशिष कुमार साहा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर ते लगेच दिल्लीला रवाना झाले. मागील काही दिवसांपासून बर्मन हे सातत्याने मुख्यमंत्री विप्लव कुमार देव (Biplav Kumar Dev) यांच्यासह सरकारवर टीका करत आहेत. राज्यात लोकशाही नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यामुळे ते भाजपला रामराम ठोकणार असल्याचे संकेत मिळत होते.
त्यानुसार बर्मन यांच्यासह त्यांचे समर्थक साहा यांनी आमदारकीसह पक्षाचा राजीनामा दिला. बर्मन यांनी काही दिवसांपुर्वीच काँग्रेसच्या नेत्यांची गुप्त भेट घेतली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्मन व साहा यांच्यासह आणखी काही आमदार त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे. भाजपमधील बंडखोर आमदार नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊ शकतात. त्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असेही सुत्रांनी सांगितले.
बर्मन व साहा यांनी काही दिवसांपासून उघडपणे पक्षाविरोधा बंड पुकारलं होतं. त्यांनी त्रिपुरातील विविध भागांत जाऊन लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे अनेक कार्यकर्ते व पक्षातील पदाधिकारीही उपस्थित होते. बर्मन यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर यापूर्वी नाराजी व्यक्त केली आहे.
पक्षाचे राज्यात 36 आमदार आहेत. त्यापैकी 10 आमदार मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या महत्वाच्या बैठकीला अनुपस्थित होते. त्यामध्ये बर्मन यांचाही समावेश होता. त्यामुळे निवडणुकीसाठी जवळपास 10 आमदार पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास हा भाजपसाठी मोठा धक्का असले. ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपने ताकद वाढवली आहे. मणिपूरमध्ये भाजप यावेळी स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.