

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या सिंहासनावर चार वेळा विराजमान झालेल्या बहुजन समाज पक्षावर (BSP) मोठे संकट घोंगावत आहे.बहुजन समाज पक्षाच्या राजकीय अस्तित्वासमोर पुन्हा एकदा मोठे आव्हान उभे राहिले आहे.
उत्तरप्रदेशातून लोकसभेत आणि विधानसभा, विधान परिषदेत पक्षाचे प्रतिनिधित्व आधीच शून्यावर आले असताना आता राज्यसभेतील एकमेव सदस्याची मुदतही संपणार आहे. त्यामुळे आगामी काळात संसद आणि उत्तर प्रदेशच्या दोन्ही सभागृहांत बसपचा एकही सदस्य उरणार नाही.
बसपचे राज्यसभेतील एकमेव खासदार रामजी गौतम यांचा कार्यकाळ २५ नोव्हेंबरला संपत आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत बसपचा एकही आमदार नसल्याने राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत स्वतःचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक संख्याबळ पक्षाकडे नाही. राज्यसभा निवडणुकीत उमेदवाराला विजयी होण्यासाठी किमान ३७ मतांची आवश्यकता आहे.
विशेष म्हणजे, बसपकडे सध्या विधानसभेतही प्रतिनिधित्व नाही. २०२२च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत बलियाच्या रसडा मतदारसंघातून उमाशंकर सिंह हे पक्षाचे एकमेव आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यांच्या निधनानंतर विधानसभेतील बसपचे प्रतिनिधित्वही संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता राज्यसभा तसेच विधान परिषद निवडणुकीत पक्षाला आपला उमेदवार निवडून आणणे कठीण ठरणार आहे.
या बदलत्या राजकीय परिस्थितीचा थेट परिणाम बसपच्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जावरही होऊ शकतो. कांशीराम यांनी १९८४मध्ये स्थापन केलेल्या बसपला १९९७मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. २०२५मध्ये निवडणूक आयोगाने हा दर्जा कायम ठेवला होता. मात्र, पुढील वर्षी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पक्षासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात.
गेल्या काही वर्षांतील बसपच्या निवडणूक कामगिरीकडे पाहिल्यास पक्षाच्या अडचणी स्पष्ट होतात. २०१९मध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी केल्यानंतर बसपचे १० खासदार लोकसभेत निवडून आले होते. त्यानंतर २०२२मध्ये उमाशंकर सिंह हे एकमेव आमदार ठरले. मात्र, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत बसपचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.
२०१९नंतर बसपने कोणत्याही पक्षासोबत आघाडी केलेली नाही. त्यामुळे राज्यसभेतील प्रतिनिधित्व टिकवण्यासाठी आवश्यक असलेले सहकारी पक्षांचे संख्याबळही पक्षाला मिळालेले नाही. आगामी काळात उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी आणि मतांची टक्केवारी त्याच्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी महत्त्वाची ठरू शकते. पक्षाच्या अध्यक्ष मायावती या २०२७च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.