

NDA politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही मंत्र्यांना डच्चू देत त्यांच्याजागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. महाराष्ट्राच्या वाट्याला अधिकचे मंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. फेरबदलाबाबत चर्चांना उधाण आलेले असतानाच आता उपपंतप्रधानपदाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे एनडीएमध्ये त्यांची ताकद वाढली आहे. या आघाडीमध्ये शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर बिहारमधील संयुक्त जनता दल चौथ्या क्रमांकावर गेला आहे. त्यामुळे केंद्रातील समीकरणेही बदलली आहे. शिंदेंच्या पक्षाला मंत्रिमंडळात झुकते माप मिळण्याची दाट शक्यता आहे.
उपपंतप्रधानपदाची चर्चा
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच 'एनडीए'तील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या जेडीयूमधून आता पक्षाचे अध्यक्ष आणि पहिल्यांदाच राज्यसभेत दाखल झालेले नितीश कुमार यांना उपपंतप्रधान करावे, अशी मागणी केली आहे. पक्षाचे आमदार पंकज मिश्रा यांनी एबीपी न्यूजशी बोलताना चर्चेला तोंड फोडले आहे. त्याआधी बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष आणि इंडिया आघाडीतील राष्ट्रीय जनता दलानेच तशी मागणी करत धक्का दिला होता.
आरजेडीच्या या मागणीला जेडीयूचे आमदार मिश्रा यांनीही पाठिंबा दिला. बिहारच्या लोकांनाही हे हवे आहे. नितीश कुमार हे २० वर्षे बिहारचे मुख्यमंत्री होते. त्याआधी ते केंद्रातही मंत्री होते. अशावेळी त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याची गरज असल्याचे विधान मिश्रा यांनी केले आहे.
आरजेडीचे ज्येष्ठ नेते मुकेश रोशन यांनी नितीश कुमार यांना केंद्रात मोठी जबाबदारी द्यायला हवी, असे म्हटले आहे. नितीश कुमार यांना रेल्वे, कृषि अशी मोठी खाती मिळायला हवीत. त्यासोबतच उपपंतप्रधानही बनवायला हवे. बिहारसाठी ही बाब गौरवास्पद ठरेल, असेही मुकेश रोशन म्हणाले आहेत.
दरम्यान, नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्रिपद सोडत राज्यसभेत जाणे पसंत केल्यानंतर राज्यात भाजपचा पहिला मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. त्यामुळे भाजपकडून नितीश कुमार यांचा सन्मान ठेवत त्यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यातच उपपंतप्रधान पदाचा मुद्दा पुढे आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.