

Congress DMK dispute : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा जाहीर करत डीएमकेशी असलेली आघाडी तोडली. त्यानंतर काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप डीएमकेच्या नेत्यांनी केला. संसदेत काँग्रेस सदस्यांच्या शेजारी न बसण्याची भूमिकाही पक्षाने घेतली होती.
आता इंडिया आघाडीला हादरा देणारी बातमी समोर आली आहे. द्रमुकला आता काँग्रेसशी कसलेशी राजकीय संबंध ठेवायचे नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. येत्या ८ जूनला इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत बोलविण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये पराभवाचा झटका बसलेल्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही बैठकीला हजेरी लावणार आहेत. पण डीएमकेने बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
द्रमुकने बैठकीबाबत स्पष्ट केले आहे की, तमिळनाडू विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसने द्रमुकसोबत विश्वासघात केल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्या भावनांचा आदर ठेवून ८ जून रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत द्रमुक सहभागी होणार नाही. या बैठकीत काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे द्रमुकने स्पष्ट केले आहे.
काँग्रेसबाबत ही भूमिका घेताना द्रमुकने इतर पक्षांबाबत मात्र वेगळी भूमिका घेतल्याचे दिसते. बैठकीला उपस्थित राहणार नसलो तरी देशाच्या हिताशी आणि लोककल्याणाशी संबंधित मुद्द्यांवर इतर सहभागी पक्षांनी मांडलेल्या मुद्यांबाबत द्रमुक नेहमीप्रमाणेच आवाज उठवत राहील, असेही द्रमुकने स्पष्ट केले आहे.
द्रमुकची भूमिका केवळ काँग्रेसविरोधी असली तरी इंडिया आघाडीसाठी हादरा देणारी आहे. काँग्रेस हा आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. आम आदमी पक्ष वगळता अन्य कोणत्याही घटकपक्षाची कोणत्याही राज्यात सत्ता नाही. द्रमुकचाही तमिळनाडूत दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे या पक्षांना काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच भाजपच्या अवाढव्य ताकदीला सामोरे जावे लागणार आहे. असे असले तरी द्रमुकच्या भूमिकेमुळे काँग्रेसची आघाडीत कोंडी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.