

दसरा म्हटलं की रावण दहन आणि वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाच्या विजयाचा संदेश, हे चित्र डोळ्यांसमोर येतं. मात्र, यंदा दिल्लीतील रामलीला मैदानावर दसऱ्याच्या निमित्ताने एक अनोखा उपक्रम पाहायला मिळणार आहे. येथे रावणाच्या पुतळ्यासोबत तब्बल 30 फुटांच्या झुरळाच्या पुतळ्याचेही दहन करण्यात येणार आहे. श्री केशव रामलीला समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे या अनोख्या दसरा उत्सवाची चर्चा सुरू झाली आहे.
दसऱ्याला रावण दहन करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, यंदा झुरळाच्या पुतळ्याचे दहन करण्यामागे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या उपक्रमाचा कोणताही राजकीय हेतू नसून, तो 'स्वच्छ भारत' आणि 'स्वच्छ दिल्ली' अभियानाशी संबंधित असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
घरात किंवा परिसरात आढळणारे झुरळ हे अस्वच्छतेशी जोडले जाते. त्यामुळे झुरळाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून स्वच्छतेचा संदेश देण्याची कल्पना समितीने मांडली आहे. केवळ घर स्वच्छ ठेवून चालणार नाही, तर घराबाहेरील परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे, याची जाणीव नागरिकांना करून देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
समाजातील अस्वच्छता दूर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, हा या उपक्रमामागील प्रमुख विचार आहे. दसऱ्याच्या पारंपरिक उत्सवाला स्वच्छतेच्या संदेशाची जोड देऊन नागरिकांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दिल्लीतील पीतमपुरा परिसरात होणाऱ्या या उपक्रमात रावण दहनासोबत झुरळाच्या पुतळ्याचे दहन हे विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याचा दसऱ्याचा संदेश आणि परिसरातील अस्वच्छता दूर करण्याचे आवाहन, या दोन्ही गोष्टी या उपक्रमातून मांडल्या जाणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.