

KPSC Chairman Arrest latest news : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. महाराष्ट्रात आयोगाच्या विद्यमान अध्यक्षांविरोधात विद्यार्थी आंदोलन करत असताना शेजारच्या कर्नाटक राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे.
कर्नाटक लोकसेवा आयोगाचे निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा साहूकार आणि सदस्य बी. व्ही. गीता यांना मंगळवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली. कर्नाटकातील एका भरती प्रक्रियेत आढळून आलेल्या अनियमितेची सध्या चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात मनी लाँर्डिंगच्या आरोपाखाली दोघांना अटक झाली आहे.
ईडीच्या बेंगलुरू विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी साहूकार यांना मंगळवारी रात्री अटक केली. त्याआधी ईडीच्या टीमने दोघांच्याही घरांसह विविध ठिकाणांची झाडाझडती घेतली होती. मागील महिन्यात दोन अधिकाऱ्यांनाही ईडीने अटक केली आहे. त्यामध्ये तत्कालीन परीक्षा नियंत्रक IAS ज्ञानेंद्र कुमार गंगवार आणि बसवराज कन्नाले यांचा समावेश आहे.
गंगवार आणि कन्नाले यांनी परीक्षेपूर्वी पेपर देण्यासाठी प्रत्येक उमेदवारामागे ३० ते ४० लाख रुपये लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ईडीने ऑगस्ट महिन्यात कर्नाटक आणि गुजरातमधील २१ ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर तपासाला वेग आला होता. या प्रकरणात सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक होत असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली औषध निरीक्षक गट ब परीक्षेतही पेपरफुटीचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आयोगाच्या अतिरिक्त सचिवांसह दोन सहायक कक्ष अधिकारी, क्लासचालकांसह दहाहून अधिक जणांना अटक केली आहे. ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याचप्रकरणानंतर विद्यार्थ्यांकडून भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.