Starlink India launch : भारतात स्टारलिंक सुरू होण्यास उशीर का? मस्क यांच्या टीकेनंतर रिलायन्सने काय सांगितले?

Reliance welcomes Starlink competition as both companies await key clearances for satellite internet services India : भारतातील उपग्रह इंटरनेट बाजारपेठेत स्पर्धेच्या मुद्द्यावरून चर्चा रंगली आहे. स्टारलिंक आणि जिओ सॅटेलाइट सेवांच्या मंजुरीची सद्यस्थिती काय, जाणून घ्या.
Mukesh Ambani And Elon Musk
Mukesh Ambani And Elon MuskSarkarnama
Published on: 
Updated on: 

Indian satellite internet market : स्टारलिंक भारतात सुरू होण्यासाठी उशीर का, यावरून एलॉन मस्क यांनी ‘एक्स’वरून अंबानी यांना उपरोधाने “डियर प्राइम मिनिस्टर” म्हणत टीका केली होती. या वादात आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भारतातील उपग्रह इंटरनेट क्षेत्रात स्टारलिंकसह कोणत्याही कंपनीच्या प्रवेशाला आपला विरोध नाही. उलट रिलायन्स नेहमी स्पर्धेचे स्वागतच करील. याशिवाय स्टारलिंकच नाही तर जिओच्या उपग्रह इंटरनेट सेवांनाही अजून सरकारची मंजुरी मिळालेली नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या निवेदनात म्हटले की, भारताने नेहमीच देशांतर्गत आणि परदेशी कंपन्यांच्या गुंतवणुकीचे आणि नवीन उपक्रमांचे स्वागत केले आहे. भारतात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक कंपनीने देशातील कायदे आणि धोरणांचे पालन करणे आवश्यक आहे.

कंपनीने आपली भूमिका स्पष्ट करताना जिओच्या प्रवासाचाही उल्लेख केला. 2016 मध्ये भारतीय दूरसंचार बाजारात प्रवेश करताना जिओकडे एकही ग्राहक नव्हता. मात्र, गेल्या दहा वर्षांत कंपनीने 53 कोटींहून अधिक ग्राहक जोडले असा दावा रिलायन्सने केला आहे. ‘आम्ही कधीही स्पर्धेला घाबरलो नाही. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा कोण देते, हे ठरवण्याची खरी कसोटी म्हणजे स्पर्धा,’ अशी भूमिका कंपनीने मांडली.

Mukesh Ambani And Elon Musk
Farmer sends rs51 money order : दुष्काळी मदत 5 हजारांची; शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवले 51 रुपये! अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?

रिलायन्सच्या या निवेदनात मस्क यांचे नाव थेट घेण्यात आलेले नाही. मात्र, कंपनीने हे स्पष्टीकरण भारतीय बाजारपेठ आणि रिलायन्सबाबत अलीकडे करण्यात आलेल्या विधानांच्या पार्श्वभूमीवर दिले आहे. स्टारलिंक ही मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीची उपग्रहावर आधारित इंटरनेट सेवा आहे. पारंपरिक मोबाइल नेटवर्क किंवा फायबर ब्रॉडबँड पोहोचणे कठीण असलेल्या दुर्गम भागांमध्येही इंटरनेट उपलब्ध करून देण्याची या तंत्रज्ञानाची क्षमता आहे.

Mukesh Ambani And Elon Musk
Sangli DCC Bank : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा दणका; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील अर्ज बाद

मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमधून भारतात स्टारलिंकच्या प्रवेशाला जाणीवपूर्वक उशीर केला जात असल्याचा आरोप केला होता. काही बड्या व्यावसायिकांना भारतीय बाजारपेठेवरील आपले वर्चस्व टिकवून ठेवायचे असल्याचा दावाही त्यांनी केला. मस्क यांनी मुकेश अंबानी यांना उद्देशून ‘पंतप्रधान अंबानी’ असा उपरोधिक उल्लेख केला होता. भारतात स्टारलिंकला स्पर्धा करण्याची संधी मिळणार की नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र रिलायन्सने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

भारताच्या उपग्रह इंटरनेट बाजारपेठेत स्टारलिंकव्यतिरिक्त रिलायन्सची जिओ सॅटेलाइट सेवा आणि भारती समूहाच्या पाठबळावर असलेली युटेलसॅट वनवेब ही कंपनीही कार्यरत होण्याच्या तयारीत आहेत. या तिन्ही कंपन्यांना सेवा सुरू करण्यासाठी काही आवश्यक परवानगी मिळाली असली, तरी अंतिम मंजुरीचा प्रश्न अद्याप कायम आहे. भारताच्या दूरसंचार मंत्रालयाने यापूर्वीच मंजुरी प्रक्रियेत भेदभाव होत असल्याचे आरोप फेटाळले होते. तिन्ही कंपन्यांची सुरक्षा तपासणी सुरू असून त्यांची प्रक्रिया साधारणपणे एकाच टप्प्यावर असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले होते. स्वस्त डेटा आणि व्यापक डिजिटल सेवांच्या जोरावर जिओने भारतीय इंटरनेट बाजारपेठेत मोठे स्थान निर्माण केले आहे.

आता स्टारलिंकसारखी उपग्रह इंटरनेट सेवा भारतात सुरू झाल्यास, विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागांतील ग्राहकांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो. मस्क यांनी भारतात परवडणाऱ्या दरांत स्टारलिंक सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात उपग्रह इंटरनेट क्षेत्रात किंमत, सेवा आणि ग्राहक मिळवण्यावरून स्पर्धा वाढू शकते. रिलायन्सचे हे निवेदन जिओ प्लॅटफॉर्म्सच्या प्रस्तावित आयपीओच्या पार्श्वभूमीवरही महत्त्वाचे ठरत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनीच्या डिजिटल व्यवसायासाठी सुमारे 108 अब्ज डॉलर मूल्यांकनाचे उद्दिष्ट चर्चेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com