

Fuel Price Hike: देशभरात गेल्या आठवडाभरात पुन्हा एकदा चौथ्यांदा इंधन दरवाढ झाली असून त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड फटका बसतो आहे. यामुळं मोठ्या प्रमाणावर महागाई भडकण्याची चिन्ह आहेत कारण आधीच याला सुरुवात झाली आहे. यावरुन आता काँग्रेसनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं आहे. मोदींना कळत नसेल तर त्यांनी युपीएचा कार्यकाळ अभ्यासावा अशा शब्दांत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी काही टिप्सही दिल्या आहेत.
सरकारनं इंधनाच्या वाढवलेल्या किंमतीवर बोलताना खर्गे म्हणाले, या सरकारनं गंभीर स्थिती निर्माण केली आहे. सरकारद्वारे लादलेलं हे संकट असून युपीए सरकारच्या काळातही अशीच स्थिती होती, ज्यावेळी कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. पण तरीही युपीए सरकारनं तेलाच्या किंमती वाढवल्या नव्हत्या उलट त्यावर सबसिडी देत लोकांना दिलासा दिला होता. तसंच याद्वारे इंधनाच्या किंमती त्यावेळी त्या स्तरावर आणल्या होत्या ज्याची बरोबरी पंतप्रधान नरेंद्र मोदी करु शकत नाहीत.
खर्गे पुढे म्हणाले, कधी ते ९० पैसे, १ किंवा २ रुपयांची वाढ करतात. यामागचा तर्क काय आहे? याचा अर्थ असा आहे की त्यांची अर्थव्यवस्थेची पडझड सुरु आहे. हे त्यांना नियंत्रित करता येत नाहीए, काँग्रेसला शिव्या देणं आणि टीका करणं याशिवाय त्यांच्याजवळ चर्चा करण्यासाठी कुठलाही अजेंडा किंवा मुद्दा नाही. जनता वैतागलेली असून एकीकडं बेरोजगारी असून दुसरीकडं महागाई वाढतेय. सगळाच तरुण वर्ग निराश झाला असून गरीब लोक संघर्ष करत आहेत. कारण गरजेच्या वस्तुंच्या किंमती आता गगनाला भिडल्या आहेत.
खर्गेंनी यावरुन थेट मोदींवर निशाणा साधताना त्यांना युपीएचा काळ अभ्यासण्याचा सल्लाही दिला. खर्गे म्हणाले, जर कोणत्या सरकारजवळ कुठलंही व्हिजन नसेल तसंच पंतप्रधानांना जर शासन परिणामकारकपणे कसं चालवायचं हे कळत नसेल तर मला वाटतं की, त्यांनी कमीत कमी युपीएच्या काळात तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेला कसं सांभाळलं असेल, कशी त्यांना आर्थिक मंदी आणि बँकिंग घोटाळ्यांनंतर एका वैश्विक संकटामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला योग्य दिशा दाखवली होती. या सर्व पैलूंना सांभाळताना त्यांनी अर्थव्यवस्थेला पहिल्या स्थानावर पोहोचवलं होतं. मी तर हे म्हणेन की मोदी सरकारजवळ कुठलंही व्हिजन नाही तसंच गरीब जनतेचीही त्यांना पर्वा नाही. तसंच त्यांना तरुणांची देखील कुठलीही काळजी नाही. ते फायदा कमावणाऱ्या सरकारी कंपन्यांना आपल्या मित्रांमध्ये विकून टाकत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.