
Harshwardhan Sapkal: राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याला काँग्रेसचा विरोध असल्याच्या बातम्या आजवर प्रसिद्ध झाल्या आहेत. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्हाला किंवा आमच्या आघाडीला नव्या भिडूची गरज नाही, असं विधान केलं होतं. पण आज सपकाळ यांनी दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली. यावेळी मनसेच्या युतीबाबत चर्चा झाली का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मनसेला सोबत घेण्याबाबत नेमकी अडचण काय? याबाबत सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, मनसेसोबत युतीबाबत हायकमांडसोबत काही चर्चा झाली का? यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, अशा प्रकारच्या आघाडीची कुठलीही चर्चा सुरु झालेली नाही. त्यामुळं जर-तरला काहीही अर्थ नाही. पण काँग्रेसच्या भूमिकेबाबत बोलायचं झाल्यास इंडिया आघाडीचे जे पार्टनर आहेत त्यांच्यासोबत ही आघाडीची चर्चा पुढे जाऊ शकते. पण मनसेचा किंवा इतर कुठलाही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. काँग्रेसनं इंडिया आघाडीच्या आणि मविआच्या सहकारी पक्षांसोबत जिल्हा स्तरावर आणि स्थानिक पातळीवर चर्चा करण्यास आम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळं राज्य स्तरावर आम्ही कुठलीही आघाडी किंवा युती करणार नाही. स्थानिक पातळीवर या सगळ्यांबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवर दिलेली आहे.
मनसेसोबत युतीबाबत काँग्रेसचे नेते सांगतात की याबाबत आमचे हायकमांड निर्णय घेतील. पण सपकाळ सांगतात की स्थानिक पातळीवर युतीबाबतचा निर्णय आम्ही सोपवलेला नाही आहे. त्यामुळं यामध्ये राज ठाकरेंची टोलवाटोलवी सुरु आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले, कुठल्याही प्रकारचा अद्याप प्रस्तावच आलेला नाही त्यामुळं टोलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्यावेळी प्रस्ताव येईल त्यावेळी चर्चा करणं संयुक्तीक राहील. त्यामुळं जरतरच्या प्रश्नाला ज्योतिष पाहून उत्तर दिल्यासारखं योग्य होणार नाही. त्यामुळं राजकीय भविष्य सांगणं हे थोडं घाईगडबडीचं होईल.
केवळ मुंबईत मनसेसोबत युती होऊ शकते का? यावरही बोलताना सपकाळ म्हणाले की, जर-तरचा विषयच गैरलागू आहे, अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही कारण कारण अशा प्रकारचा प्रस्तावच आलेला नाही. इंडिया आघाडीच्या सहकारी पक्षांसोबत ही चर्चा होऊ शकते, त्यामुळं जोपर्यंत याबाबत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत कुठलीही चर्चा सुरु होत नाही.
सपकाळ यांनी सविस्तरपणे भूमिका मांडताना सांगितलं की, "मुळात इंडिया आघाडी ही स्थापनच दोन कारणांसाठी झाली. आधी महाविकास आघाडी झाली यामध्ये भाजपला दूर ठेवणं या आघाडीचा हेतू होता. कालांतरानं महाविकास आघाडी ही राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी झाली. यामागचं मूळ कारण हे आहे की संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन करणं. तसंच भाजपची हुकूमशाही हाणून पाडण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. या मुल्यांवर ज्या पक्षांचा विश्वास आहे ते सर्वजण इंडिया आघाडीचे घटक आहेत. त्यामुळं नव्या कोणाला जर इंडिया आघाडीत यायचं असेल तर राष्ट्रीय स्तरावर केवळ काँग्रेसचं नव्हे तर इतरही अनेक पक्ष आहेत यांच्याशी चर्चा करुनच नवीन पक्ष या आघाडीत घेण्याबाबत चर्चा होऊन मग पुढे त्याबाबत निर्णय होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.