Jharkhand : मागील काही दिवसांपासून झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ सुरू असून दररोज नवा ट्विस्ट येत आहे. ईडीने अटक केल्यानंतर हेमंत सोरेन यांनी त्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यांना हायकोर्टात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे झारखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी होणार आहे. त्याआधी सोरेन यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळेल, अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती.
ईडीने (ED) दोन दिवसांपुर्वी हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना कथित भूखंड घोटाळाप्रकरणी अटक केली आहे. त्याआधी सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला. सोरेन यांनी अटक होण्यापुर्वीच झारखंड मुक्ती मोर्चाच्या (JMM) आमदारांची बैठक घेत चंपई सोरेन (Champai Soren) यांच्या नावावर मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार म्हणून शिक्कामोर्तब केले होते.
चंपई सोरेन यांनी गुरूवारी राज्यपालांची भेट घेत त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देण्याची विनंती केली. पाठिंबा असलेल्या आमदारांचा व्हिडिओही त्यांना दाखवण्यात आला. त्यानंतर आता आज शपथविधी होणार आहे. तर नव्या सरकारला पुढील दहा दिवसांत विधिमंडळात आपले बहुमत सिध्द करण्यास सांगण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. न्यायालयाने सोरेन यांना झारखंड हायकोर्टात जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे सोरेन यांना दिलासा मिळालेला नाही. तर दुसरीकडे ईडी विशेष कोर्टात त्यांच्या कोठडीबाबत आज निर्णय येऊ शकतो. न्यायालयाने गुरूवारी त्यावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे.
ईडीने सोरेन यांची दहा दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी कोर्टात केली आहे. कोर्टाने निकाल राखून ठेवल्याने सोरेन यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता आज विशेष कोर्ट काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेमंत सोरेन तुरूंगात असताना त्यांच्या पक्षाचे चंपई सोरेन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.