
Rahul Gandhi on Operation Sindoor : लोकसभेत सध्या ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु असून नुकतीच विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर अनेक प्रश्न उपस्थित केले. तसंच दोन दिवसांपासून या विषयावर जी चर्चा झाली. सत्ताधारी लोकांनी यावर जी भूमिका मांडली त्या भूमिकांना खोडून काढण्याचं कामही त्यांनी केलं. चर्चेदरम्यान इंदिरा गांधी यांच्यावरही भाजपच्या खासदारांनी टीका केली. त्यावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिलं आहे. इंदिरा गांधीपेक्षा अर्धी हिंमत असेल तर ट्रम्प खोटं बोलत आहेत हे त्यांनी आज सांगून दाखवावं असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी म्हणाले, "जर मोदींमध्ये दम असेल तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहात सांगावं की डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत. सध्या एक नवा शब्द जन्माला आलाय की, न्यू नॉर्मल. परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या भाषणात हा शब्द वापरताना म्हटलं की, सर्वच देशांनी दहशतवादाचा निषेध केला आहे. हे एकशेएक टक्के खरं आहे, पण पहलगाम हल्ल्यानंतर एकाही देशानं पाकिस्तानाचा निषेध केलेला नाही. याचा अर्थ काय तर जग पाकिस्तानसोबत आपली तुलना करत आहे. यापूर्वी युपीएचं सरकार होतं तेव्हा भारत स्पष्टपणे सांगत होता की पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतो आहे, तर तसंच दहशतवादाला पोसत असल्यानं त्याचा निषेधही केला होता"
"यानंतर आणखी काही मजेशीर बाबी सभागृहात सांगितल्या गेल्या. आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी आणि संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं की, आपण पाकिस्तानला रोखलं. तुम्ही खरोखरच पाकिस्तानला रोखलंय का? ठीक आहे मग पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांचा हात होता. या माणसानं नंतर अमेरिकेच्या अध्यक्षांसोबत जेवण केलं. आपले पंतप्रधान अमेरिकेला जाऊ शकले नाहीत पण पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मस्त जेवण करत होते. याद्वारे ट्रम्प यांनी सगळेच प्रोटोकॉल तोडून टाकले आहेत. तसंच जो माणूस भारतात दहशतवाद पसरवतोय त्याला माणसाला ट्रम्प यांनी निमंत्रित केलं.
पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना काहीही बोलले नाहीत. त्यांनी ट्रम्प यांना विचारलही नाही की तुम्ही मुनीर यांना तुमच्या कार्यालयात कसं काय बोलावलंत? म्हणजे सरकार एकीकडं म्हणतंय की, आम्ही पाकिस्तानला रोखलं आणि दुसरीकडं या पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हा ट्रम्पयांच्यासोबत जेवण करतो. त्यावर ट्रम्प म्हणतात की, मुनीर यांचे आभार मानायला इथं आलो आहे. कशासाठी तुम्हाला आभार मानायचे आहेत? तसंच सध्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर, अमेरिकेचे जनरल मायकल कुरेला आणि चार मध्य आशियातील देशांचे जनरल यांची नुकतीच एक परिषद घेतली दहशतवाद कसा रोखायचा या विषयावर. हे असेल लोक आपल्या भोवती आहेत आणि ते जगाला सांगत आहेत. त्यामुळं मला हे विचारायचं आहे की, आपले परराष्ट्रमंत्री हे कोणत्या ग्रहावर राहत आहेत"
भारत सरकार म्हणतंय की कोणताही दहशतवादी कारवाई म्हणजे युद्ध आहे. मग याचा अर्थ असा होतो की, जर कोणत्याही दहशतवाद्याला भारताला युद्ध करण्यासाठी उसकवायचं असेल तर त्याला तुम्ही ही पॉवरच देऊन टाकलीय की, तुम्हाला जर युद्ध पाहिजे असेल तर तुम्ही एक हल्ला करा तुम्हाला युद्ध मिळेल. जर उद्या पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर तुम्ही काय करणार पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारणार का? म्हणजेच या सरकारला युद्ध रोखणं याचा अर्थच कळत नाहीए, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारवर सडकून टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.