

Mumbai News : देशभरात चर्चेत असलेल्या सुमारे 6 हजार कोटी रुपयांच्या महादेव ऑनलाइन बेटिंग सिंडिकेट प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) मोठे यश मिळाले आहे. या बेकायदेशीर बेटिंग नेटवर्कचा कथित सूत्रधार आणि महादेव ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला ओमानमधून भारतात आणण्यात आले आहे. सीबीआयने अन्य केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने ही महत्त्वपूर्ण कारवाई केली. विशेष पथकाने ओमानमध्ये जाऊन चंद्राकरचा ताबा घेतला असून, त्याला रायपूर येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सौरभ चंद्राकर आणि या प्रकरणातील कथित सहसंस्थापक रवी उप्पल यांनी मिळून महादेव ऑनलाइन बेटिंगचे मोठे नेटवर्क उभारल्याचा आरोप आहे. या दोघांनी ऑनलाइन सट्टेबाजीच्या माध्यमातून देशभरात मोठे सिंडिकेट चालवले होते, असा तपास यंत्रणांचा दावा आहे. 2019 च्या आसपास चंद्राकर आणि उप्पल हे दुबईला गेल्याचे सांगितले जाते. त्यानंतर विविध ऑनलाइन बेटिंग ॲप्लिकेशन्स आणि वेबसाइटच्या माध्यमातून त्यांनी या नेटवर्कचे संचालन सुरू ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि बेकायदेशीर सट्टेबाजीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
प्रत्यार्पणासाठी प्रयत्न
सौरभ चंद्राकरला भारतात आणण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते. इंटरपोलने जारी केलेल्या रेड नोटीसच्या आधारे ऑक्टोबर 2024 मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. भारत सरकारने त्याच महिन्यात चंद्राकरच्या प्रत्यार्पणासाठी अधिकृत विनंती केली होती. मात्र, त्यावेळी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. अखेर आता ओमानमधून त्याला भारतात आणण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे.
रवी उप्पलबाबत संभ्रम
या प्रकरणातील दुसरा कथित सूत्रधार रवी उप्पल याच्याबाबतही तपास यंत्रणांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. यूएईने त्याच्याविरोधातील प्रत्यार्पण प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये तो बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे उप्पलचा शोध घेणे तपास यंत्रणांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
आर्थिक व्यवहारांचे गूढ उकलणार?
महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणात बेकायदेशीर सट्टेबाजी, मनी लाँडरिंग आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशांची उलाढाल केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय (ED), सीबीआय आणि अन्य केंद्रीय यंत्रणांकडून सुरू आहे.
सौरभ चंद्राकरच्या भारतातील प्रत्यार्पणामुळे या कथित सिंडिकेटचे आर्थिक व्यवहार, बेटिंग नेटवर्कचे संचालन आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींच्या भूमिकेबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. आता रायपूर येथील विशेष न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे आणि तपासातील पुढील घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.