

Nepal floods China connection: नेपाळ आणि चीनच्या तिबेट सीमेजवळ आलेल्या भीषण महापुराने मोठी हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर आता चीनच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. नेपाळमधील काही पत्रकारांच्या गटाने गंभीर आरोप केले आहेत की, पूरस्थितीचा धोका आणि संभाव्य आपत्तीबाबत चीनने नेपाळला वेळेत माहिती दिली नाही, असा दावा केला आहे. या आरोपांमुळे नेपाळ-चीन संबंधांमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर नेपाळमधील चीनचे राजदूत झांग माओमिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ग्यिरोंग-रसुवागढी सीमा परिसरात झालेल्या नैसर्गिक आपत्तीबद्दल दुःख व्यक्त करत चीन आणि नेपाळ या दोन्ही देशांमध्ये मोठी जीवितहानी आणि नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
झांग माओमिंग यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली. "या कठीण काळात चीन नेपाळच्या पाठीशी ठामपणे उभा आहे," असे त्यांनी म्हटले. चीनमध्येही या आपत्तीचा मोठा फटका बसला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, परिस्थिती गंभीर असतानाही चीनने नेपाळसाठी आपत्कालीन मदत सामग्री आणि आर्थिक मदतीची तातडीने व्यवस्था केल्याचा दावा त्यांनी केला.
नेपाळला पुढेही शक्य ती सर्व मदत देण्याचा प्रयत्न चीन करेल, असे झांग माओमिंग यांनी स्पष्ट केले. दोन्ही देश एकत्रितपणे या संकटातून बाहेर पडतील आणि पूरग्रस्त भागात पुन्हा जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मात्र, नेपाळच्या पत्रकारांनी केलेल्या मुख्य आरोपावर म्हणजेच चीनने पूरधोक्याची माहिती वेळेत का दिली नाही, यावर चिनी राजदूतांनी थेट भाष्य केलेले नाही. त्यांचे वक्तव्य प्रामुख्याने चीनकडून सुरू असलेल्या मदतकार्य आणि आर्थिक सहाय्यावर केंद्रित राहिले.
ग्यिरोंग-रसुवागढी हा चीन आणि नेपाळमधील महत्त्वाचा सीमावर्ती भाग आहे. त्यामुळे या महापुरानंतर आपत्तीच्या वेळी माहितीची देवाणघेवाण, पूर्वसूचना आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. खरचं नैसर्गिक आपत्ती आहे की अजून काय याबद्दल तर्कवितर्क काढले जात आहेत.
दरम्यान, नेपाळ आणि चीनमध्ये आलेल्या फ्लॅश फ्लडमुळे मृतांचा आकडा वाढत असल्याचे वृत्त आहे. उपलब्ध माहितीनुसार नेपाळमध्ये आतापर्यंत 157 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 403 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. चीनच्या बाजूला 265 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. हिमालयीन सीमाभागातील या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दोन्ही देशांमध्ये बचाव आणि मदतकार्य सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.