नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता भाजपसह विरोधकांनी उमेदवार निवडीसाठी चर्चा सुरू केली आहे. भाजपकडून सर्वोनुमते नाव निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांशी संपर्क साधला जात आहे. तर विरोधकही आम्ही जे नाव सुचवू त्यावर भाजप विचार करणार का, असा सवाल करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीसाठी भाजपला काही मतांची बेगमी करावी लागणार आहे. पण त्यांनी एक नाव पुढे केल्यास ओडिशातील बिजू जनता दलाची सर्व मतं त्यांच्या पारड्यात पडून विजय सुकर होऊ शकतो. (Presidential Election 2022 News)
केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी काँग्रेस (Congress) नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) या नेत्यांशी संपर्क साधून उमेदवार सुचविण्यास सांगितले. मात्र, या नेत्यांनी ‘एनडीए’चा उमेदवार कोण आहे ते आधी सांगावे? अशी विचारणा राजनाथसिंह यांच्याकडे केली. त्यावर उत्तर मिळाले नसल्याचेही या नेत्यांचे म्हणणे होते.
तर दुसरीकडे एनडीए आणि विरोधकांपासून दूर असलेले बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आपले पत्ते खुले केले आहेत. त्यामुळे भाजपचं टेन्शन कमी होऊ शकते. या पक्षाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रपती पदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय उमेदवार जाहीर झाल्यानंतर घेतला जाईल. पक्षातील सुत्रांनी सांगितले की, एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपने हेच नाव पुढे केल्यास पटनाईक त्याला विरोध करणार नाहीत.
द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील आहेत. त्यांचा जन्म ओडिशातीलच आहे. वर्ष 2000 मध्ये भाजप आणि बीजेडीच्या आघाडी सरकारमध्ये त्या मंत्रीही होत्या. या परिस्थितीत बीजेडीकडून राज्यातील आणि आदिवासी नेत्याचं नाव पुढे आल्यास विरोध होणार नाही. असं झाल्यास भाजपला राष्ट्रपती पदाची निवडणूक सोपी होणार होईल. बीजेडीच्या पारड्यातील सर्व मतं मुर्मू यांना मिळू शकतील.
दरम्यान, विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर एनडीएच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे. ज्यामध्ये उमेदवाराच्या नावावर चर्चा होईल, त्यानंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीला जाण्यापूर्वी एनडीएच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांनी एनडीएचे घटक पक्ष असलेल्या जेडीयूचे नेते नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.