

Punjab Congress update : केरळमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर आता काँग्रेसने पंजाबकडे मोर्चा वळविला आहे. राज्यात पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पक्षाने जय्यत तयारी सुरू केली असून काही दिवसांपूर्वी विविध समित्याही तयार केल्या आहेत. मात्र, आता पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यातील मतभेद टोकाला पोहोचल्याचे चित्र आहे. चन्नी यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदासाठी नेत्यांवर दबाव वाढविला जात असल्याची चर्चा आहे. त्यावरून पक्षात उघडपणे दोन गट पडले आहेत. राज्यातील पक्षाचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी दोन गटात विभागले गेले आहेत.
काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. रविवारी त्याबाबतचे संकेत मिळाले. पंजाब काँग्रेसचे पभारी भूपेश बघेल आणि वडिंग यांच्यासमोरच चननी झिंदाबादची घोषणाबाजी झाली. निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित बैठकीतच हा गोंधळ झाल्याने पक्षाच्या तयारीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
राज्यात २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर वडिंग यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. यावेळी त्यांना बदलले जाईल, अशी अपेक्षा चन्नी यांना होती. मात्र, पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी वडिंग यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला. त्यामुळे चन्नी गट दुखावल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावरही दोन नेत्यांमधील वाद उफाळून आल्याने पक्षासमोर संकट उभे ठाकले आहे.
राहुल गांधींना करावी लागणार कसरत
राहुल गांधी यांना दोन्ही नेत्यांमधील वाद मिटविण्यासाठी आणि राज्यात पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यानही पक्षात दोन गट पडले होते. त्यामुळे हातातोंडाशी आलेला विजय गटबाजीमुळे हिरावला गेला होता. नेत्यांमधील गटबाजी हा राहुल गांधी यांच्यासाठी नेहमीच आव्हानात्मक मुद्दा राहिला आहे. ही वाद मिटविण्यात पक्ष नेतृत्वाला बहुतेकवेळा अपयश आले आहे. आता पंजाबमध्येही त्यांची परीक्षा असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.