

Congress News : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागील सुमारे २० दिवसांपासून परदेश दौऱ्यावर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्या दौऱ्याबाबत स्वत: राहुल गांधी यांच्यासह पक्षाकडूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मागील काही दिवसांपासून काँग्रेस केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक आहे. 'छात्रों की गूंज' या आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाने विद्यार्थ्यांची संवादाची मोहीम हाती घेतली आहे.
राहुल गांधी यांनी १७ जूनला राजस्थानमधून या आंदोलनाची सुरूवात केली. कोटा येथे झालेल्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसादही मिळाला होता. मात्र, त्यानंतर देशभरात कुठेही हा कार्यक्रम झाला नाही. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत १२ जुलै म्हणजे रविवारी ही रॅली बिहारमध्ये होणार होती. मात्र, हा कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आला आहे. आता १७ जुलैला डेहराडून येथे 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमात राहुल गांधी दिसणार आहेत.
तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर काँग्रेस पक्षाचा हा कार्यक्रम होणार असल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. येत्या २० जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. यापार्श्वभूमीवर 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पेपरफुटी, शिक्षणाची स्थिती आदी मुद्द्यांवर राहुल गांधी यांना आपली भूमिका मांडता आली असती. मात्र, तब्बल २० दिवसांपासून ते कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे मागील काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा १५ वा दिवस आहे. इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी या व्यासपीठावर जात त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र, या कालावधीत दुसरीकडे इंडिया आघाडी किंवा राहुल गांधी यांच्याकडून सरकारला घेरण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे दिसले नाही.
राहुल गांधी हे परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर दिल्लीत अज्ञात व्यक्तींकडून त्यांचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यावरून बरेच राजकारणही झाले होते. खरेतर परदेशात गेल्यानंतर राहुल गांधी हे अनेकदा तेथील विविध संस्थांकडून आयोजित संवाद कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याचे दिसतात. मात्र, यावेळी सुमारे २० दिवसांपासून ते नेमके कुठे आहेत, असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. भाजपकडूनही टीका होऊ लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.