
Sanjay Raut Complaint: ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता राज ठाकरेंना महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु आहे. मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका देखील आगामी काळात होणार आहेत. त्यामुळं मनसेला लवकरात लवकर आघाडीत घेण्यासाठी खुद्द संजय राऊत हे आग्रही आहेत. पण याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळं संजय राऊत यांनी थेट सपकाळ यांच्याविरोधात दिल्लीतील काँग्रेस हायकमांडकडं पत्र लिहून तक्रार केल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
दिल्लीतील काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीना पत्र लिहून संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं की, मनसेला महाविकास आघाडीत समावून घेण्यास हर्षवर्धन सपकाळ यांचा विरोध आहे. हा विरोध त्यांनी आपल्यासमोरही व्यक्त केला होता. राज ठाकरेंबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन नंतर तुम्हाला याबाबत कळवतो असं सपकाळ यांनी राऊत यांना कळवलं होतं. पण तरीही राऊतांनी काँग्रेस हायकमांडकडे सपकाळ यांची तक्रार केल्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते संजय राऊतांवर नाराज झाले असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळते आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या कथित काँग्रेस हायकमांडकडं केलेल्या तक्रारीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, दिल्लीत महाविकास आघाडीचं एक शिष्टमंडळ येऊन काँग्रेसच्या हायकमांडला भेटलं. या शिष्टमंडळात महाराष्ट्रातील काँग्रेसनेत्यांचा देखील समावेश होता. हे शिष्टमंडळ या कारणासाठी भेटलं की, निवडणूक आयोगाचा जो गोंधळ आहे त्या अनुषंगानं त्यांच्या डोळ्यात अंजन घालणं हा शिष्टमंडळाचा हेतू होता.
या हेतूच्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्षाचे नेते हे निवडणूक आयोगाला आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत. त्यामुळं यावेळी आघाडी आणि युतीची कुठली चर्चाच या भेटीदरम्यान झालेली नाही. त्यामुळं या चर्चा अनावश्यक असल्याचं वाटतं. राऊतांच्या तक्रारीचा यात प्रश्नच नाही, आम्ही फक्त त्या शिष्टमंडळात सहभागी होतो, इतकीचं ही गोष्ट आहे.
मनसेला आघाडीत घेण्याबाबत बोलताना सपकाळ म्हणाले, "इंडिया आघाडीचे घटक कोण असतील? काय असतील? हा निर्णय राष्ट्रीय स्तरावर होणार आहे. इंडिया आघाडीचे देशभरात पार्टनर्स आहेत त्यामुळं या आघाडीत कोणाला घ्यायचं? कोणाला नाही? या सर्वांशी बोलून देशभरातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मनसेला घ्यायचं की नाही घ्यायचं हा निर्णय होणार आहे. यानंतर जे प्रस्ताव पुढे येतील तेव्हाच यावर भाष्य करणं ठीक राहील"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.