

Seattle Diwali event Hindu protest : अमेरिकेतील सिएटल येथे भारतीय समुदायातील नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात काही परंपरावादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अडथळा आणला.
‘सर्व हिंदूंना देशाबाहेर काढा’, ‘ख्रिश्चनांऐवजी हिंदू नकोत’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या घोषणाबाजीचा भारतीय समुदायाने आणि अनेक अमेरिकी खासदारांनी निषेध केला.
सिएटल येथे एके ठिकाणी दिवाळीचा (Diwali) कार्यक्रम सुरू असतानाच काही परंपरावादी कार्यकर्ते तेथे घुसले. काही कलाकारांचा मंचावर नृत्याचा कार्यक्रम सुरू असतानाच या कार्यकर्त्यांनी मंचासमोर येत घोषणाबाजी केली. त्यांना सुरक्षा रक्षकांनी तातडीने बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक नेत्यांनी आणि नागरिकांनी अडथळा आणणाऱ्यांचा निषेध केला.
कार्यक्रमात घुसलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जेक लँग याचा समावेश होता. तो ‘व्हाइट रिप्लेसमेंट’ या संघटनेशी संबंधित आहे. जेक लँग आणि थॉमस ॲलन या कट्टरपंथी कार्यकर्त्यांनी अमेरिकन ध्वज फडकावत कार्यक्रमात प्रवेश केला. त्यांच्या हातात भारतीयांना आणि हिंदूंना (Hindu) लक्ष्य करणारे आक्षेपार्ह फलक होते. त्या फलकांवर सर्व भारतीयांना देशाबाहेर काढा आणि ख्रिश्चनांच्या जागी हिंदूंची होणारी वाढ थांबवा, असे वर्णद्वेषी आणि वादग्रस्त संदेश लिहिलेले होते.
अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालानंतर, ज्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा ज्यो बायडेन यांनी पराभव केला होता, सहा जानेवारी 2021 ला वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीवर हल्ला करणाऱ्यांमध्ये लँगही एक होता. त्याला या बद्दल चार वर्षांच्या तुरुंगवासाचीही शिक्षा झाली होती. मात्र, ट्रम्प हे 2025 मध्ये सत्तेवर आल्यानंतर लँगची शिक्षा माफ करण्यात आली.
आंदोलनाचा मुख्य सूत्रधार जेक लँग हा अमेरिकेतील नुकत्याच झालेल्या मध्यवर्ती निवडणुकांमध्ये टेक्सास राज्यात रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या अपयशाचा राग हिंदू समुदायावर काढत होता. निवडणुकांमधील पराभवाला हिंदू समुदाय कारणीभूत असल्याचा दावा त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केला आहे, तसे समोर आले आहे.
भारतीय वंशाच्या अमेरिकन काँग्रेस महिला प्रमिला जयपाल यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या, "हा अत्यंत घृणास्पद आणि वर्णद्वेषी प्रकार आहे. हिंदू समुदायाला आपली संस्कृती आणि सण सुरक्षित वातावरणात साजरे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा द्वेषभावनेला आमच्या शहरात आणि देशात जागा नाही."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.