Delhi Political News : खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झाला आहे. उभयतांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना हकालपट्टीचे आदेश दिले आहेत. निज्जरच्या हत्येशी भारतीय एजन्सींचा संबंध असल्याचा कॅनडाने आरोप केला आहे. हे आरोप फेटाळून भारतानेही कॅनडाला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी आंतराष्ट्रीय स्तरावर कॅनडाला पाठिंबा वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मदतीला काँग्रेसचे अभ्यासू नेते शशी थरूर धावून आले आहेत. त्यांनी अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांना खडेबोल सुनावले आहेत. (Latest Political News)
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
हरदीपसिंग निज्जरच्या हत्येतून भारताने दुसऱ्या देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. यावर शशी थरूर म्हणाले, पाश्चिमात्य देशांतील माध्यमांतून होत असलेल्या टिप्पणीत काहीही आश्चर्य वाटण्यासारखे नाही. हे लोक इतर देशांना न्याय देण्यात आपला वेळ घालवत नाहीत. त्यांना यात काहीही रस नसतो. यापूर्वी पाश्चिमात्य देशांनी रशिया, इराण आणि सौदी अरेबिया या देशांच्या वतीने अशा हत्यांचा निषेध केला होता. आता ते या देशांच्या यादीत भारताला ठेवू इच्छित नाहीत.
निज्जरच्या हत्येतून कॅनडाने उचललेल्या पावलांना अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पाठिंबा दिला आहे. तसेच भारताने कॅनडाच्या तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याचा समाचार घेताना शशी थरूर यांनी अमेरिकेसह इतर देशांना खडेबोल सुनावले आहेत.
शशी थरूर (Shashi Tharoor) म्हणाले, 'गेल्या २५ वर्षांत इतर कोणत्याही देशात जाऊन सर्वाधिक हत्या कोणी केल्या असतील, तर ते अमेरिका आणि इस्रायल या देशांनी. त्यामुळे त्यांनी आधी आरशात पाहावे, नंतर दुसऱ्या देशांकडे बोट दाखवावे.' यापूर्वीही शशी थरूर यांनी ब्रिटिशांना फटकारले होते. त्यांनी लंडनमध्ये जाऊन ब्रिटिशांवर टीका केली होती. भारतातील गरिबीला ब्रिटिशच जबाबदार असल्याचे त्यांनी खडसावून सांगितले होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अडचण वाढत असताना त्यांनी मोदी सरकारची साथ दिली. त्यांनी भारताला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांवर हल्लाबोल केला आहे. शशी थरूर यांनी दीर्घकाळ संयुक्त राष्ट्रांमध्ये काम केले आहे. त्यामुळे दोन राष्ट्रांतील वाढलेल्या तणावाच्या स्थितीत त्यांचे मत महत्त्वाचे ठरते. त्यांची परराष्ट्र धोरणातील तज्ज्ञांमध्येही गणना होते.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.