

Hyderabad News: मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हैदराबाद येथील गोशामहल पोलीस स्टेडियममध्ये बुधवारी (ता.21) आयोजित पोलीस स्मृती दिन परेडला संबोधित करताना ही घोषणा केली. तसेच तेलंगणा पोलीस विभागातील सर्व रिक्त पदे 2028 पर्यंत भरण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानात वाढ करण्याची घोषणाही केली.
हैदराबादमधील गोशामहल येथील पोलिस हुतात्मा स्मारकावर आयोजित पोलिस स्मृतिदिन परेडला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी उपस्थित होते. दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
तेलंगणा राज्य पोलीस भरती मंडळाने यापूर्वीच 7,437 पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. मात्र, राज्यातील विविध भागांतील अनेक उमेदवार पोलीस विभागातील पदांची संख्या वाढवण्याची मागणी करत आहेत. कारण, विभागात सुमारे 20 हजार पदे रिक्त असल्याचे सांगितले जाते. भरतीची मागणी करणाऱ्या उमेदवारांनी अनेक महिन्यांपासून आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
रेवंत रेड्डी म्हणाले, राज्यातील पोलिस दल अधिक सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे 2028 पर्यंत सर्व रिक्त पदे भरण्याचे निर्देश त्यांनी पोलीस विभागाला दिले आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच 112 उपपोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, तृतीयपंथीयांना वाहतूक सहाय्यक म्हणून नियुक्त केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्डच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी सानुग्रह अनुदानाची रक्कम 5 लाख रुपयांवरून 10 लाख रुपये करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पोलीस महासंचालक सी. व्ही. आनंद यांना दिले.
याशिवाय, इतर पदांवरील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मदतीच्या रकमेतही सुधारणा करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक (SP) आणि भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना आता 1 कोटी रुपयांऐवजी 2 कोटी रुपये दिले जातील.
तर हेड कॉन्स्टेबलपासून ते अतिरिक्त पोलीस अधीक्षकांपर्यंतच्या (Additional SP) अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना आता 1 कोटी ते 1.5 कोटी रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. यापूर्वी ही रक्कम 45 लाख रुपये होती.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पोलिसांच्या मदत वाढवलेली रक्कम ही केवळ आर्थिक सहाय्य नसून, शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती आदर व्यक्त करण्याचा एक मार्ग असल्याचं नमूद केलं. तसेच महिला आणि बालकांशी संबंधित प्रकरणे हाताळताना पोलिसांनी अधिक संवेदनशीलता दाखवावी आणि पीडितांना न्याय मिळण्यास विलंब होणार नाही, याची खात्री करावी, असे निर्देश प्रशासनाला दिले.
महिलांची सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून, समाजातील प्रत्येक व्यक्तीची त्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या विविध उपक्रमांचाही उल्लेख केला.
यात महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या ‘शी टीम्स’, ‘स्टँड विथ हर’ मोहीम, महिला आणि बालकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने संरक्षण देणाऱ्या ‘स्पंदना’ टीम्स आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘यंग इंडिया पोलीस स्कूल’ यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.