

NEET-UG 2026 परीक्षा रद्द प्रकरण आणि पेपर लीक वादाशी संबंधित प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टानं राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) कार्यप्रणालीवर गंभीर चिंता व्यक्त केली. तसंच वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्याबाबतही भाष्य केलं. त्यामुळं आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाच ही जबाबदारी स्विकारुन राजीनामा देण्याची नामुष्की ओढवणार असल्याची चिन्हं आहेत.
न्या. पी. एस. नरसिम्हा आणि न्या. अलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी NTA बरखास्त करण्याची आणि त्याच्या रचनेमध्ये मोठा बदल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी कोर्टानं म्हटलं की, NTA ला त्या संस्थांकडून शिकणं गरजेचं आहे की, जे मोठ्या प्रमाणावर कुठल्याही पेपरफुटी शिवाय यशस्वीरित्या परीक्षा घेतात. न्या. नरसिम्हा म्हणाले, UPSCच्या परीक्षेत कधीही अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. NTA ला यापासून शिकायला हवं. यामध्ये खऱ्या अर्थानं तोडगा तेव्हा शक्य आहे जेव्हा हे स्पष्ट होईल की, कोणत्याही अपयशाची जबाबदारी कोणत्या व्यक्तीवर आहे. केवळ संस्थात्मक जबाबदारी निश्चित करणं हे पुरेसं ठरणार नाही.
सुप्रीम कोर्टानं यावेळी केंद्र सरकारला निर्देश दिले की, सरकारनं एक प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल करावं आणि यामध्ये सांगावं की NTA संस्थागत स्मृती विकसित करण्यासाठी काय पावलं उचलली जात आहेत. कारण भविष्यात या एजन्सीकडं परीक्षा या निष्पक्ष आणि सुरक्षितपणे आयोजित करण्याची क्षमता आणि विशेषता उपलब्ध राहील.
महत्वाची बाब म्हणजे, सरकारची बाजू मांडणारे महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी आज सुप्रीम कोर्टात हे सांगितलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत" म्हणजेच पंतप्रधान जर या प्रकरणात लक्ष घालणार असतील तर सुप्रीम कोर्टाच्या वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्याच्या टिप्पणीची अंमलबजावणी करायची झाल्यास ही जबाबदारी सहाजिकच शिक्षण मंत्र्यांवरच येऊन पडेल. त्यामुळं त्यांचा राजीनामाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकारानंतर ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर अनेक डॉक्टरांच्या संघटनांनी आणि विद्यार्थी संघटनांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत NTA बरखास्त करण्याची आणि त्याऐवजी एक वैधानिक राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरण स्थापन करण्याची आणि भविष्यात परीक्षांची न्यायिक निगरानीची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.