Congress Internal Dispute : कमाल टायमिंग! डिलीमिटेशन विधेयकापूर्वीच काँग्रेसच्या खासदाराची जाहीर नाराजी, अधिवेशनाला अनुपस्थित राहणार?

Congress MP displeasure before delimitation bill : डिलीमिटेशन विधेयक संसदेत मांडण्यापूर्वीच काँग्रेस खासदाराने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित खासदार अधिवेशनाला अनुपस्थित राहणार का? जाणून घ्या राजकीय घडामोडी.
Lok Sabha delimitation proposal 824 seats; PM Modi
Lok Sabha delimitation proposal 824 seats; PM Modisarkarnama
Published on: 
Updated on: 

केंद्रातील मोदी सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात मतदारसंघ पुनर्रचना (डिलीमिटेशन) आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयके पुन्हा मांडणार आहे. ३० नोव्हेंबरपासून लोकसभेचे कामकाज सुरू होणार आहे. ही विधेयक मंजूर करण्यासाठी मोदी सरकारला दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या खासदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून आपल्या खासदारांना व्हीप बजावला जात असतानाच उत्तर प्रदेशातील सीतापूरचे काँग्रेसचे खासदार राकेश राठोड यांनी पक्षनेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाकडून आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप केला आहे. संसदेच्या महत्त्वपूर्ण अधिवेशनाच्या तोंडावरच राठोड यांनी आपली खदखद व्यक्त केल्याने त्यांच्या वक्तव्याचे टायमिंग महत्त्वाचे ठरले आहे.

Lok Sabha delimitation proposal 824 seats; PM Modi
Kunbi Certificate Scam : 'एजंट' नाही म्हणून तब्बल 1136 कुणबी दाखले रखडवले; अधिकाऱ्यांच्या कारभाराचा मराठा समाजाकडून मोठा भांडाफोड

'माझ्याच मतदारसंघात कार्यक्रम घेतात, मला सांगतही नाहीत'

राकेश राठोड यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाकडून आपल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना आहे. मात्र, आपल्याकडे नेमके कोणत्या कारणामुळे दुर्लक्ष केले जात आहे, हेच समजत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'खासदार झाल्यापासून मी सातत्याने पक्षासाठी काम केले आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात फिरून शंभर मोठे कार्यक्रम घेतले. पक्षासाठी दिवस-रात्र संघर्ष करत आहे. मात्र, माझ्याच मतदारसंघात पक्षाचे पदाधिकारी आणि प्रभारी येतात, कार्यक्रम घेतात आणि निघून जातात. त्याची साधी माहितीही मला दिली जात नाही,' असे राठोड यांनी म्हटले आहे.

'खासदारांना दूर ठेवलं, म्हणून मीही बाजूला झालो'

काँग्रेसच्या 'संघटन सृजन' अभियानावरूनही राठोड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अलीकडेच या अभियानाच्या निमित्ताने फिरणाऱ्या एका व्यक्तीने खासदारांना या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याचे सांगितले. खासदारांनाच दूर ठेवण्यात आले असेल, तर मीही त्यातून बाजूला झालो. आता त्यांना मला केवळ गर्दीचा एक भाग बनवायचे असेल, तर मी त्यासाठी योग्य व्यक्ती नाही, अशा शब्दांत राठोड यांनी पक्षाच्या संघटनात्मक कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

राठोड यांच्या नाराजीचे टायमिंग महत्त्वाचे का?

एप्रिल महिन्यात मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत आवश्यक बहुमताअभावी मंजूर होऊ शकले नव्हते. आता सुधारित विधेयकाच्या माध्यमातून मोदी सरकार पुन्हा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सत्ताधारी एनडीएला विरोधी पक्षांतील खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासू शकते. दुसरीकडे, काँग्रेसने आपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. सर्व खासदारांना एकसंध ठेवण्याचे आव्हान पक्षनेतृत्वासमोर असताना राठोड यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.

Lok Sabha delimitation proposal 824 seats; PM Modi
MSRTC employees protest : ST कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार; 'या' तारखेपासून राज्यभर आंदोलनाची इशारा; नेमक्या मागण्या काय?

राठोड यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. तसेच पक्ष सोडण्याचा किंवा पक्षादेशाविरोधात मतदान करण्याचा किंवा अधिवेशनाला अनुपस्थित राहण्याचा इशाराही दिलेला नाही. मात्र, महत्त्वपूर्ण विधेयक संसदेत येण्याच्या काही दिवस आधीच त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केल्याने काँग्रेस नेतृत्व त्यांच्या नाराजीची कशी दखल घेणार, याकडे लक्ष लागले आहे.