

Fact Check Viral Indira Gandhi Post: पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळं आयात करण्यात येणारे कच्चे तेल, खाद्य तेल अन् सोन्याच्या आयातीमुळं देशाचं परकीय गंगाजळीवर परिणाम होत आहे. याचे गंभीर आर्थिक परिणाम आता दिसून लागले आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच देशवासियांना वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहानावर काँग्रेससह विरोधकांनी सडकून टीका केली आहे. यानंतर आता सोशल मीडियात 'द हिंदू' या इंग्रजी वर्तमानपत्राचं कात्रण शेअर होत आहे. ज्यात इंदिरा गांधींनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशहितासाठी सोनं खरेदी करु नका असं आवाहन देशवासियांना केल्याची हेडलाईन दिसत आहे. पण आता हा प्रकार खोटा असून शेअर होणारं कात्रण हे AIच्या मदतीनं तयार केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावर आता काँग्रेसनं प्रतिक्रिया दिली आहे.
इंदिरा गांधींच्या नावानं व्हायरल होत असलेली ही पोस्ट देशभरातील मोदी समर्थकांनी आपल्या फेसबूक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन जोरदार शेअर केली आहे. यामध्ये अनेक मान्यवर व्यक्तींचाही समावेश आहे. एकूणच हे सर्वजण एआयच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या बनवेगिरीला बळी पडले आहेत. पण आता या बनवेगिरीच्या मागचा उद्देश काय आहे? कोणी हा प्रकार तयार करुन शेअर केला आहे? याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावरच आता काँग्रेसनं देखील अधिकृतरित्या आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसनं व्हायरल होत असलेल्या इंदिरा गांधींच्या बातमीच्या या कात्रणाचं फॅक्ट चेक केलं आहे. काँग्रेसनं म्हटलं की, "स्वतःची नाचक्की लपवण्यासाठी फेक न्यूज आणि वृत्तपत्रांची बनावट कात्रणं छापण्याचा कारखानाच त्यांनी उघडला आहे. “इंदिराजींनी सोनं खरेदीला बंदी घातली होती” किंवा “मनमोहन सिंगांनी इंधन रोखलं होतं” अशा बाळबोध आणि निर्लज्ज पुड्या आता त्यांच्या ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’च्या माध्यमातून पोहोचवल्या जातील. त्यामुळं या पोस्टपासून सावध राहा, कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. काँग्रेसच्या खंबीर नेतृत्वाने देशाला नेहमीच दिशा दिली आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटं आली, तेव्हा काँग्रेसने ढाल बनून जनतेचं रक्षण केलं. त्यांनी जबाबदारी झटकून पळ काढला नाही किंवा संकटाच्या काळात इव्हेंटबाजी केली नाही! काँग्रेसचा इतिहास संघर्षाचा आणि कर्तव्याचा आहे, डरपोकपणाचा नाही"
इंदिरा गांधींच्या संदर्भात ज्या द हिंदू या इंग्रजी वर्तमानपत्राचं कात्रण सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं आहे. त्यावर द हिंदू या वृत्तपत्रानं देखील खुलासा केला आहे. द हिंदूनं थेट ज्या दिवशीचं हे कात्रण व्हायरल झालं आहे. त्या दिवशीच्या वर्तमानपत्रातील हेडलाईनची बातमी काय होती ते शेअर केलं आहे. ही बातमी त्या दिवशी इंदिरा गांधींच्या संदर्भातील नव्हती, हे मूळ पेपरच्या कात्रणातून स्पष्ट होतं. त्यामुळं सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेलं हे कात्रण बनावट एआय मार्फत तयार केल्याचं द हिंदूनं म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.